39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयनिष्ठावान सैनिक!

निष्ठावान सैनिक!

मनोहर जोशी यांचा जीवनपट म्हणजे एखाद्या हिंदी चित्रपटाची वास्तवात उतरलेली ‘सक्सेस स्टोरी’च आहे. ध्येयाकडे लक्ष ठेवून अत्यंत खडतर व संघर्षमय जीवनाचा प्रवास करून सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावरही आपले पाय जमिनीवरच घट्ट रोवून ठेवायचे, सुसंस्कृतपणा कायम ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपली पक्षनिष्ठा, तत्त्वनिष्ठा अजिबात ढळू द्यायची नाही, ही आजच्या राजकीय वातावरणातील अत्यंत दुर्मिळ गोष्ट. स्वार्थ व सत्ता यासाठी कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलण्याचा पायंडा पडलेला असताना आपल्या नेत्याने कुठलेही कारण न देता ‘मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दे आणि भेटायला ये,’ असा निरोप धाडल्यावर साधे ‘का?’ असेही न विचारता तत्काळ त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नसानसात फक्त आणि फक्त पक्षनिष्ठा लागते? ती मनोहर जोशी यांच्या रक्तात भिनलेली होती. म्हणूनच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते शिवसेनेचे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक राहिले.

अत्यंत खडतर, संघर्षमय जीवनाची सुरुवात असूनही त्याचा कुठलाच कडवटपणा मनात न बाळगता सगळ्या अडथळ्यांवर जिद्दीने व संयमाने मात करून आपले जीवन कृतार्थ करणारा हा निष्ठावान सैनिक काळाच्या पडद्याआड निघून गेला असला तरी त्याने आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप स्वकियांच्याच नव्हे तर विरोधकांच्याही मनात सोडली आहे. रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेड्यात २ डिसेंबर १९३७ रोजी जन्मलेल्या मनोहर जोशी यांचा जन्म सुसंस्कृत कुटुंबात झाला असला तरी घरात अठराविश्व दारिद्र्यच होते. त्यामुळे जन्मल्यापासूनच त्यांना ‘कमवा व शिका’ हा मंत्र अवगत करावा लागला. पाचवीपर्यंत महाड येथे शिक्षण झाल्यावर ते शिक्षणासाठी पनवेलला मामाकडे आले. मामांची बदली झाल्यावर त्यांनी पनवेलच्या गोल्फ क्लबमध्ये बॉयची नोकरी स्वीकारली. मित्राच्या खोलीत ते भाड्याने राहिले. प्रसंगी माधुकरी मागत शिक्षण सुरू ठेवले. अकरावीला शिक्षणासाठी ते मुंबईला बहिणीकडे राहिले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले व पदवी प्राप्त केली. बृहन्मुंबई महापालिकेत ते नोकरीला लागले. आपल्यासारख्या संघर्ष करणा-या तरुणांना व्यवसायाचे व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळावे म्हणून एका खोलीतून त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची सुरुवात केली.

पुढे जिद्दीने त्यांनी या इन्स्टिट्यूटचे मोठ्या उद्योगसमूहात रुपांतर केले. १९६७ साली बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेशी थेट नाते सांगणारी राजकीय संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना केली आणि बाळासाहेबांचे अग्रणीचे शिलेदार बनून मनोहर जोशी शिवसेनेत दाखल झाले. तेथून त्यांचा एकीकडे भिक्षा मागणारा जिद्दी शाळकरी मुलगा ते अब्जाधीश व यशस्वी उद्योजक तर दुसरीकडे सामान्य शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री व पुढे लोकसभेचा अध्यक्ष असा समांतर प्रवास सुरू झाला. तो त्यांनी आपल्या अफाट कर्तबगारीने लीलया पेलला व दोन्हीकडे त्यांना मिळालेल्या यशामुळे ते ‘सर’ उपाधीचे मानकरी ठरले! शिवसेनेला मुंबई-ठाण्याबाहेर महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात अनुकूलतेची एक साधी झुळूकही जाणवत नसताना मनोहर जोशी यांची शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अविचल निष्ठा होती जी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अजिबात ढळू दिली नाही. निष्ठावंत सैनिक म्हणून जवळपास सहा दशकांचा त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, अत्यंत संयमाने त्यांनी तो केला. व शेवटचा श्वास सोडला तोही बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक म्हणूनच! त्यांना त्यांच्या या निष्ठेचे फळही मिळाले.

ज्या महापालिकेत नोकरी केली त्या मुंबई महापालिकेचा महापौर, महाराष्ट्र राज्यातील पहिला काँग्रेसेतर मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा समृद्ध राजकीय प्रवास राहिला. या प्रवासात आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचा मान वाढवून जबाबदारीस योग्य न्याय देण्याचे काम मनोहर जोशी यांनी केले. मनोहर जोशी यांनी आपल्या कार्यकौशल्य व कर्तबगारीने शिवसेनेच्या वेगळ्या रूपाची देशाला ओळख करून दिली. दुर्दैवाने शिवसेनेला पक्ष म्हणून त्याचा फारसा उपयोग करून घेता आला नाही. बाळासाहेब ठाकरे व मनोहर जोशी यांनी १९६९ मध्ये एकत्र तुरुंगात खस्ता खाल्ल्या. त्यातून त्यांच्यात एक अतूट नाते तयार झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची निवड करण्यामागे त्यांचा ‘सरां’च्या कर्तबगारीवर व व्यवस्थापन कौशल्यावर असणारा विश्वास होता. बहुमत नसताना अपक्षांना सोबत घेऊन कुणालाही नाराज न करता पाच वर्षे सरकार चालविणे सोपे नसतेच. मनोहर जोशीच म्हणजे बाळासाहेबांचे ‘पंत’च हे करू शकतात हा बाळासाहेबांचा विश्वास होता.

म्हणूनच बाळासाहेबांनी जातीचे समीकरण बाजूला ठेवून राज्याला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला व ‘सरां’नी हा विश्वास सार्थ ठरवला. मुंबईतील ५० पेक्षा जास्त उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, एक रुपयात झुणका-भाकर, मातोश्री वृद्धाश्रम ही मनोहर जोशी यांची महाराष्ट्राला मिळालेली देण आहे. शिवसेनेचे पक्षनेते म्हणून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर त्यांनी अफाट वक्तृत्वाच्या जोरावर असंख्य विषय पटलावर मांडून ते धसाला लावले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत उत्तमपणे जबाबदारी पार पाडली. पुढे अचानक त्यांच्यावर लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. तीही त्यांनी एवढ्या उत्तमरीत्या सांभाळली की ते विरोधी पक्षांचेही लाडके अध्यक्ष बनले. देशातल्या चारही सभागृहांचा, म्हणजे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा सदस्य राहण्याची त्यांना संधी मिळाली व त्याचे त्यांनी सोने केले. पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खो-यातील प्रलंबित पडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्याचे धाडस मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून दाखविले.

जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी त्यांनी ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ सारख्या योजना राबविल्या. टँकरमुक्त महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला. अखेरच्या पर्वात त्यांच्यावरही पक्षात ‘फुले वेचली तिथे…’ अशी परिस्थिती आली पण ते अविचल राहिले. त्यांनी अजिबात आपली पक्षनिष्ठा ढळू दिली नाही. वयाच्या साठीनंतर ‘शिवसेना काल, आज व उद्या’ हा दीर्घ शोध प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेटही प्राप्त केली. संयम व जिद्दीला संघर्षाची व सुसंस्कृतपणाची जोड देऊन एखादा माणूस आपल्या कर्तबगारीने किती अफाट मजल मारू शकतो व यशोशिखरावर असतानाही पाय जमिनीवरच कसे ठेवू शकतो, आपली निष्ठा किती अविचल ठेवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोहर जोशी ‘सर’! बाळासाहेबांच्या या निष्ठावान सैनिकाला विनम्र आदरांजली!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR