28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयनिसर्गाचा फटका

निसर्गाचा फटका

राज्यात गत काही  दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणतात तसे अवकाळी पावसाला गारपिटीची साथ मिळाली आहे. ४-५ दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतो आहे. त्यात गारपीट होत असल्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश परिसरात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारा, गारपिटीसह मुसळधार पाऊस सुरू आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले आहे. सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रात रबी पिकांसह फळबागांना पाऊस-गारपिटीचा तडाखा बसला. चांदूर बाजार, मोर्शी, वरूड व अचलापूर तालुक्यात सुमारे १८ हजार हेक्टरमधील संत्रा, मोसंबी, केळी, आंबा पिकांचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे फळबागांचे विशेषत: लिंबू, संत्रा, आंबा, केळी बागांचे मोठे नुकसान झाले. राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे त्यात अवकाळी पाऊस-गारपिटीची भर पडली आहे. अवकाळी पावसाने मराठवाड्यातही मोठे नुकसान झाले. परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांना गुरुवारी अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. लातूर जिल्ह्यातही तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होतो आहे. त्यामुळे खरीप, रबी आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. उशिरा पेरणी झालेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे.

अवकाळीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. केळी, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. औसा तालुक्यातील लामजना व फत्तेपूर येथे वीज कोसळल्याने तीन जनावरे दगावली. नांदुर्गा शिवारातील किमान सहा ते सात हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. द्राक्षबागा उन्मळून पडल्या. जळकोट, उदगीर, शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाला झालेल्या नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. परंतु सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने नुकसानभरपाई मिळण्यास विलंब लागेल असे दिसते. बीड जिल्ह्यातील धारूर, वडवणी परिसरात वादळी वा-यासह गारपीट झाली. हिंगोली शहरासह जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी वादळी वा-यांसह गारपीट झाली. यात ज्वारी, हळदीसह, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पूर्णा तालुक्यात गहू, ज्वारीसह काढणीस आलेली पिके तसेच फळबागांना फटका बसला.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच उत्पन्न कमी आणि उत्पादनाचा खर्च अधिक अशी अवस्था झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतमजुरीत दुपटीने वाढ होऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत. शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. दरवर्षी गुढीपाडव्याला शेतमजुरीच्या दरात वाढ होत असल्याने शेतक-याचे गणित बिघडले आहे. गुढीपाडव्याला शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालदार किंवा शेतमजूर ठेवावे लागतात. ते सहजासहजी मिळत नाहीत. आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आल्याने शेतक-यांना शेती करणे अवघड झाले आहे. वडिलोपार्जित व पिढ्यान्पिढ्या शेती व्यवसाय सुरू असल्याने शेती करायची तर सालगड्याशिवाय पर्याय नाही. सध्या वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत. शासनाच्या विविध योजनांतर्गत गोरगरिबांना पुरेल एवढे अन्नधान्य कमी किमतीत मिळते. अनेक कुटुंबांना त्याचा फायदा होतो. ग्रामीण भागात मजूरवर्ग काम करण्यास तयार नाही. कामावर जाण्यासाठी ते मनमानी पद्धतीने मजुरी मागतात.

पूर्वी शेतमजुरांना अन्नधान्याच्या स्वरूपात मजुरी दिली जायची. मात्र, आता शासनाच्या अनेक योजनांद्वारे अन्नधान्य अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होते त्यामुळे आता मजूरवर्गाने धान्यासाठी काम करणे बंद केले आहे. त्यांना रोख पैसे हवे आहेत. चार-पाच दशकांपूर्वी सालगडी तीन अंकी पगारात खुश असायचा. नंतर तो  आकडा पाच अंकापर्यंत वाढत गेला. आता तो आकडा सात अंकात गेला आहे तरीसुद्धा सालगडी मिळेनासा झाला आहे. सालगडी राहण्यापेक्षा रोजंदारीने काम करणा-यांची संख्या वाढली आहे. वर्षभर एकाच शेतक-याकडे राहण्यापेक्षा रोजंदारीने काम करण्यास मजूर वर्गाने पसंती दिली आहे. त्यामुळे आज ‘कसेल त्याची शेती’असे समीकरण बनले आहे. तेव्हा शेती करायची असेल तर स्वत: शेतीत राबा अथवा शेती विकून स्वस्थ बसा अशी परिस्थिती आहे. निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेती हा बेभरवशाचा व्यवसाय बनला आहे. राज्यात सध्या संमिश्र हवामानाची स्थिती आहे. काही भागात उष्णतेची लाट, काही भागात वादळी पावसासह गारपिटीचा फटका सहन करावा लागत आहे. गत दोन-तीन दिवसांत वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीपासून मध्य महाराष्ट्र, कोकण पार करून वायव्य राजस्थानपर्यंत द्रोणीय स्थिती, विखंडित वारे तसेच कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. विदर्भात गारपीट तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे. अवकाळी पावसाबरोबरच राज्यातील सर्वच भागात तीव्र उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसराला उष्णतेचा कमाल तडाखा सहन करावा लागत आहे.  तेथे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तापमान अचानक कमी-जास्त होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. निसर्गाची अवकृपा झाली की नुकसान शेतीचेच होते. शेतकरी नागवला जातो. अवकाळीच्या फटक्याने नुकसान झालेल्या शेतक-यांना सावरण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. हे शिवधनुष्य कोणते सरकार उचलणार? आता तरी ‘अब की बार’ म्हणा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR