36.2 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणीपरभणीतून महादेव जानकरांना उमेदवारी

परभणीतून महादेव जानकरांना उमेदवारी

परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा केली आहे. यापूर्वी अजित पवार गटाने रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून शिवाजी आढळराव-पाटील यांची नावे जाहीर केली आहेत.

परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव खासदार आहे. त्यामुळे महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होणार आहे. परभणीची जागा रासपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून देण्यात आली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत ही जागा जानकर यांना देण्यात आली.

राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात करत प्रचारात आघाडी घेतली आहे. आधी महादेव जानकर माढ्यातून शरद पवार गटातून लढणार अशी चर्चा होती. त्यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. मात्र ऐनवेळी पलटी मारत जानकर महायुतीत गेले.

परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परभणीतील जनतेने नेहमी शिवसेनेचा उमेदवार निवडून दिला आहे. मात्र यावर्षी राजकीय गणितं बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट, महाग पडू शकते. १९९९ पासून ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे.

२०१९ मध्ये शिवसेनेचे जाधव संजय विजयी झाले होते. त्यांना ५३८९४१ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे राजेश उत्तमराव विटेकर दुस-या क्रमांकावर होते. विटेकर यांना ४९६७४२ मते मिळाली होती..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR