34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरबार्शी नगरपरिषदेचे कंत्राटी संगणक ऑपरेटर सात महिन्यापासून वेतनाविना

बार्शी नगरपरिषदेचे कंत्राटी संगणक ऑपरेटर सात महिन्यापासून वेतनाविना

बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या विविध विभागामध्ये कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या संगणक ऑपरेटरांचे संबंधित ठेकेदाराकडून मागील सात महिन्यांपासून वेतनच दिले नाही. सात सात महिने राब – राब राबूनही वेळेवर पगार होत नाही, संगणक साक्षर असूनही बाहेर कुठे नोकरी मिळत नाही, नेमका याच गोष्टीचा गैरफायदा ठेकेदाराकडून होत असून, या कंत्राटी तरुणांची अक्षरशः पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. वास्तविक नगरपरिषदेने ठेकेदाराचे बिल उशिरा काढले तरी प्रत्येक महिन्याला बेळेवर पगार देण्याचे काम संबंधित ठेकेदाराचेच आहे. तरीही याकडेदुर्लक्ष केले जात आहे.

सध्या नगरपरिषदेत विविध विभागात कंत्राटी पदावर २२ कर्मचारी कार्य करीत आहेत. नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्र, घरपट्टी, आरोग्य, अभिलेख कक्ष, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग आदी सर्वच विभागात इमाने इतबारे हे तरुण-तरुणी काम करीत आहेत. खूपच तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. नगरपरिषदेने ठेकेदारांची बिले दिली तरी संबंधित ठेकेदार जितक्या महिन्याचा पगार देणे बाकी आहे,

ती संपूर्ण रक्कम कधीच अदा करीत नाहीत. तरीही या कंत्राटी कामगारांची तक्रार नसते. परंतु आचारसंहिता लागू झाल्याने नेमका पगार कधी मिळणार, या चिंतेत सध्या हे कंत्राटी कामगार दिसून येत आहेत.

कर्मचाऱ्यांना एक दोन महिन्याचा पगार देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न करत तीन चार महिन्याचा पगार थकीत ठेवण्याचा प्रकार सर्रासपणे केला जात आहे. यात तरुणांचे हातचे काम जाईल म्हणून या तरुणांना कोणाकडे तक्रारही करण्याची मुभा नाही. विनातक्रार काम करीत असतानाही या तरुणांना पगार मिळत नाही.

याबाबत मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना विचारले असता, संबंधित ठेकेदारास पगार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, एवढेच सांगितले. हे सांगूनही २० दिवस झाले तरी संबंधित ठेकेदारास घाम फुटला नाही.काम करूनही वेळेवर पगार न होण्याची अवस्था वाहन विभागातील कंत्राटी चालकांची आणि संपूर्ण शहर स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी चव्हाण यांनीच लक्ष घालून सर्व संबंधित ठेकेदारांना सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR