32.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषबिगुल वाजला, महाराष्ट्राकडे देशाच्या नजरा

बिगुल वाजला, महाराष्ट्राकडे देशाच्या नजरा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व दोन नवनियुक्त निवडणूक आयुक्तांनी अखेर शुक्रवारी लोकसभेच्या व चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. देशात सात टप्प्यांत, तर राज्यात ५ टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. देशातील जवळपास २० राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होत असताना महाराष्ट्रात दोन, तीन नाही तर चक्क पाच टप्प्यांत निवडणूक घेण्याचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सत्ताधा-यांच्या सोयीसाठी हे केले आहे का? अशी शंकाही खाजगीत व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी मराठा आंदोलकांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी अनेक मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन पाच टप्पे केले असावेत, असेही सांगितले जात आहे.

कारण काहीही असो, पण पाच टप्प्यांमुळे तब्बल दोन महिने राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असणार आहे. २० मार्च रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होणा-या मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होईल, तर २० मे रोजी पाचव्या म्हणजे राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. शुक्रवारपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून, चार जूनला मतमोजणी होऊन नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत ही आचारसंहिता लागू राहणार आहे. ज्या राज्यातील मतदान पूर्ण होते तेथील आचारसंहिता काही प्रमाणात शिथिल केली जाते. पण महाराष्ट्रात पाचही टप्प्यांत मतदान असल्याने दोन महिने सगळेच ठप्प होणार आहे. याची पूर्वकल्पना असल्यामुळे राज्य सरकारने मागच्या आठवड्यात तीन मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णयांची आतषबाजी केली. कदाचित हा योगायोगही असेल. पण सरकारने निर्णयांचा धडाका लावला होता. आयोगाची घोषणा होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिमंडळाने निर्णय घेतले.

निवडणुकीचा बिगुल वाजला तरी महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाचा घोळ मात्र अजूनही संपलेला नाही. दोन्हीकडील मंडळी गेल्या आठवड्यापासून, ‘बहुतांश सगळं झालंय, फक्त थोडं राहिलंय’ असे सांगत असतात. वादाला, बंडखोरीला फार वेळ मिळू नये ही रणनीतीही यामागे असू शकेल. पण सगळं आलबेल नाहीय हे नक्की. भाजपाने देशातील पावणेदोनशे व महाराष्ट्रातील २० उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. काँग्रेसनेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पण भाजपाचा अपवाद वगळता कोणीच महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. गुरुवारी पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची सुरुवात होणार असल्याने जागावाटप संपवून काही उमेदवार जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. जागावाटप अजून जाहीर झाले नसले तरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा व शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या विरोधकांच्या सभेने प्रचाराचा नारळ फुटला आहे.

राहुल गांधी यांच्या यात्रेचे महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत जोरदार स्वागत झाले. धारावीतील ‘रोड शो’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्कवरील सभेला इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हजेरी लावली. लोकांचा प्रतिसादही उत्स्फूर्त होता. राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्राचे राजकारण गेल्या साडेचार वर्षांपासून तापलेलेच आहे. निवडणुकांमुळे आता त्याचा परमोच्च बिंदू येणार आहे. येणारी लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची असणार आहे. देशात सलग तिस-यांदा बहुमताने सत्तेत येण्याची खात्री असणा-या भाजपा नेत्यांचा महाराष्ट्रात मात्र घाम निघणार असे चित्र आहे. महाविकास आघाडी व महायुतीतील महाराष्ट्राच्या महासंग्रामाकडे देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या जवळपास सर्व जनमत चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात एनडीएला मागच्याएवढे यश मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. जागांचे अंदाज वेगवेगळे असले तरी दोन पक्ष व मोठे नेते फोडून भाजपाची बेरीज नाही तर वजाबाकीच झाल्याचे पुढे आले आहे. सहा महिन्यांनी होणा-या विधानसभा निवडणुकीची नाळ या निवडणुकीतील निकालांशी जोडली गेली आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार असल्याने स्वाभाविकच ही निवडणूक सर्वांसाठी महत्त्वाची असणार आहे.

महायुतीची सगळी मदार मोदींवर !
विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात २०२४ ला देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला असला तरी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. काँग्रेस, इंडिया आघाडी आणि एनडीएमधील मतांचे अंतर कमी झाले असून, ही बाब भाजपाला नक्कीच चिंतेत टाकणारी आहे. प्रत्यक्ष मतदानापर्यंत हाच ट्रेंड सुरू राहिला तर चारशे पार सोडाच, तीनशे पार करतानाही दमछाक होऊ शकते याची जाणीव त्यांना आहे. फेब्रुवारी महिन्यात सीव्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात महाविकास आघाडीला २६ व महायुतीला २२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. महविकास आघाडीला ४४.५ टक्के, तर भाजपा युतीला ४०.५ टक्के मते मिळतील, असे भाकित वर्तविण्यात आले होते. मागच्या आठवड्यात याच संस्थेचा मार्चमधील सर्व्हे आला. त्यात महायुतीला २८ व महाविकास आघाडीला २० जागा मिळतील असे भाकित वर्तविण्यात आले आहे. महिनाभरात महायुतीच्या मतांच्या आकडेवारीत सुधारणा झालीय असे त्यांचे म्हणणे आहे. बाहेरची स्थिती फारशी बदललेली नसताना जनमत चाचण्यांचे निष्कर्ष मात्र बदलले आहेत. राज्यातील महायुती सरकार, फोडाफोडीचे राजकारण याबद्दल लोकांमध्ये नाराजी असली तरी मोदी फॅक्टरमुळे मतांची आकडेवारी जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी वाढत जाईल, असे काही राजकीय पंडितांना वाटते आहे.

हा युक्तिवाद मान्य केला तरी मिशन-४५ तर बाजूलाच राहिले, पण मागच्या वेळच्या जागाही राखता येणार नाहीत, हे तर स्पष्ट दिसते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तसेच अजित पवार यांना पक्षाचे नाव व चिन्ह मिळाले असले तरी, निवडणुकीत उद्धव ठाकरे व शरद पवार गटाला अधिक जागा मिळतील, असेही भाकित वर्तवण्यात आले आहे. भाजपाने जागावाटपात निवडून येण्याच्या क्षमतेच्या आधारेच अधिक जागांवर दावा केला होता. सर्वेक्षणाचे अंदाजही त्यांच्या याच शंकेवर शिक्कामोर्तब करणारे आहेत. कलम ३७० रद्द करणे, नागरिकत्व कायदा (सीएए) राममंदिर आदी विषय या निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी असतील व त्याचा फायदा होईल, असा भाजपच्या पोल पंडितांचा दावा होता. पण गेल्या काही दिवसांपासून ‘निवडणूक रोखे’ हा विषय सर्वत्र ट्रेडिंग आहे. सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठीच केलेला नाही, तर त्यांचा धाक दाखवून बड्या उद्योगांकडून देणग्या, खंडणी वसूल केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मोदींच्या लोकप्रियतेवर भाजपाची सगळी मदार असताना थेट त्यावरच विरोधकांचे हल्ले सुरू आहेत.

दक्षिण भारतातील १२९ जागांपैकी केवळ २९ जागा भाजपाकडे आहेत. त्यातील २५ कर्नाटकातील आहेत. कर्नाटकात सरकार बदलले आहे. तेलंगणात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तामिळनाडू व केरळमध्ये फारसा स्कोप नाही. आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसमबरोबर युती केलीय त्याचा काही प्रमाणात फायदा होईल. तामिळनाडू अजूनही स्वप्नच आहे. त्यामुळे दक्षिणेत फार काही मिळणार नाही. आत्ताच्या जागा राखल्या तरी खूप झाले, अशी स्थिती आहे. पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र या तीन राज्यांतील स्थितीही मागच्यावेळीचे यश टिकवता येईल का? अशी आहे. बलस्थान असलेल्या हिंदी पट्ट्यात उत्तर प्रदेश वगळता वाढण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल व बिहार ही चार राज्ये भाजपासाठी खूप महत्त्वाची असतील. महाराष्ट्रातला महासंग्राम शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याएवढाच एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचा आणि त्यांचे भवितव्य ठरवणारा असणार आहे. त्याचा बिगुल वाजला आहे. या निकालाकडे देशाचे लक्ष असणार आहे.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR