32.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषभाजपाचा बडगा, महायुतीत अस्वस्थता !

भाजपाचा बडगा, महायुतीत अस्वस्थता !

लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असले तरी राज्यातील सत्ताधारी महायुती व महविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटलेला नाही. अर्ध्यापेक्षा कमी संख्याबळ असूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत बरोबरीचा वाटा देणा-या भाजपाने लोकसभेच्या जागावाटपात मात्र आपल्या या मित्रांना झटका दिला आहे. निवडून येण्याची क्षमता मित्रपक्षांपेक्षा भाजपात अधिक आहे. त्यामुळे भाजप ३५ जागा लढवेल व या दोघांनी १३ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव भाजपाने दिला होता. अर्थातच दोघांनीही तो फेटाळून लावला आहे. शिवसेनेच्या १८ विद्यमान खासदारांपैकी १३ खासदार शिंदेंसोबत भाजपाबरोबर आले आहेत.

त्यामुळे त्यांच्या व आणखी दोन-तीन अशा १६ जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी होती. अजित पवारांना सोबत घेताना लोकसभेच्या ९ व विधानसभेच्या ९० जागा सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनाही याची अपेक्षा होती. पण भाजपाने शिंदे आणि अजित पवारांना फार फार तर १५ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागच्या आठवड्यात मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. मतदारसंघांमधील राजकीय परिस्थिती व स्वतंत्र यंत्रणेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात भाजपाला विजयाची अधिक संधी असल्याबाबत अहवाल आले आहेत. त्यामुळे भाजपाला अधिक जागा लढवाव्या लागतील. लोकसभा निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना अधिक जागा सोडता येणार नाहीत, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. पण ही अवमानास्पद तडजोड स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे दोन दिवसांनी पुन्हा दिल्लीत बैठक झाली. या दोन पक्षाच्या काही लोकांना भाजपच्या चिन्हावर उभे करण्याचा नवीन प्रस्ताव पुढे आला. पण तो ही मान्य झालेला नाही. त्यामुळे आजवर इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील बेबनावाच्या बातम्या चवीने वाचणा-या युतीच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. शिंदे आणि अजित पवारांवर अपमानास्पद तडजोड स्वीकारू नये यासाठी पक्षातून दबाव आहे. त्यामुळे यातून कसा मार्ग निघणार याबाबत प्रश्नच आहे. आपल्या प्रेमासाठी माहेर सोडून आलेल्या सुनेला कसेही वागवले तरी मुकाटपणे जाच सहन करेल, असा भाजपा नेत्यांचा कयास असावा. पण तसे होताना दिसत नाही. कोणीतरी मागे हटल्याशिवाय तोडगा निघू शकणार नाही, हे तर उघडच आहे. लोकसभेच्या जागांसाठी प्रसंगी महाराष्ट्रातील सत्तेचा सारीपाट उधळून देण्याची हिंमत दोन्हीकडूनही दाखविली जाणार नाही, हे ही उघड आहे. त्यामुळे या पेचातून कसा मार्ग काढला जातो याबद्दल उत्सुकता आहे.

निवडून येण्याची क्षमता भाजपात अधिक आहे, त्यामुळे आम्ही अधिक जागा लढवणार हा भाजपाचा युक्तिवाद मित्रपक्षाच्या गळी उतरायला तयार नाही. भाजपात निवडून येण्याची क्षमता असेल व आमच्यात ती नसेल तर त्यांनी आम्हाला सोबत कशासाठी घेतले आहे? असा प्रश्न उपस्थित केला जाणे स्वाभाविक आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती विचारात घेतली तर फुटलेल्या नेत्यांपेक्षा तोडफोडीचे राजकारण करणा-या भाजपावर अधिक रोष दिसतो आहे. असे असताना केवळ हे कारण देऊन विद्यमान खासदारांच्या जागाही सोडण्यास नकार दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेत तिखट प्रतिक्रिया उमटली आहे. रामदास कदम यांनी तर भाजपावर थेट हल्ला चढवताना, ‘जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका’ असे सुनावले. महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. अन्यथा लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचे भान ठेवा, असे रामदास कदम यांनी भाजपाला सुनावले.

दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही जागावाटपावरून प्रचंड नाराजी आहे. शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही मिळाल्या पाहिजेत, मोदी लाटेतही यश मिळवणा-याचा सन्मान झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. महायुतीत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या ९ जागा आणि विधानसभेच्या ९० जागा देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. आता ९ जागा सोडायला भाजपा तयार नसेल तर विधानसभेला ९० जागा सोडतील याची काय शाश्वती आहे? असा सवाल केला जातोय. अपमानास्पद तडजोड करण्यापेक्षा दोन पावलं मागे गेलेले परवडेल, अशी भूमिका काही आमदारांनी घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असलेले काही आमदार येणा-या काळात स्वगृही परतले तर फार आश्चर्य वाटायला नको. जागावाटपावरून महायुतीत तणाव असला तरी शिंदे किंवा अजित पवार टोकाचा निर्णय घेणार नाहीत हे नक्की. येत्या दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होणार असून, मार्ग निघेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. हा निर्धार ठेवून परवाच्या बैठकीत चर्चा झाली. सध्या आमच्यात ८० ते ८५ टक्के जागावाटप पूर्ण झाले आहे. दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होणार आहे. महायुतीतील मित्रपक्ष आणि आमच्यात कुठेही नाराजी नाही. मित्रपक्षांना विश्वासात घेतच चर्चा सुरू आहे, असा दावा तटकरे यांनी केला.

महाविकास आघाडीत वंचितमुळे किंचित अडचण !
महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची स्थिती चांगली आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. काँग्रेसने सर्वाधिक आमदार असूनही सामंजस्याची भूमिका घेऊन फुटलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीला सन्मानाने जागा दिल्या. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे अंतिम शिक्कामोर्तब अडकले आहे. वांचितने त्यांना नेमक्या किती व कोणत्या जागा हव्या आहेत ते आजवर उघडपणे सांगितलेले नाही. तात्विक पातळीवरच चर्चा सुरू ठेवली आहे. भविष्यात आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे उद्धव ठाकरे व शरद पवारांनी लेखी दिले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी काहीशी अवास्तव वाटत असली तरी पूर्वीचे अनुभव पाहता चुकीची तरी कशी म्हणता येईल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते बाहेर पडले आहेत. तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड आहे. सगळे जनमत चाचण्यांचे अंदाज तेच सांगतायत. प्रकाश आंबेडकर आघाडीत आले तर त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे थोडे नमते, पडते घेऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आघाडीच्या नेत्यांची पराकाष्ठा सुरू आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात !
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात दाखल होत असून, १७ मार्च रोजी शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेने या यात्रेची सांगता होणार आहे. एक प्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच या सभेत फुटणार आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून, मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला सध्या मुंबईत तळ ठोकून या सभेची तयारी करत आहेत.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR