37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रमविआच्या कार्यालयात दररोज गोपूजन !

मविआच्या कार्यालयात दररोज गोपूजन !

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. धार्मिक कार्यात आघाडीवर असलेला नेता, अशी ख्याती पावलेले खैरे यांनी प्रचार कार्यालयासमोर डाव्या कोप-यात कपिला गाय बांधली आहे. त्या गायीची दररोज पूजा केली जाते. ही कामधेनू खैरेंना पावणार का, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार गायीला माता म्हटले जाते. जिथे गोमाता, तेथे लक्ष्मीचा निवास असतो. कपिला तेही काळ्या गायीला विशेष महत्त्व आहे. तिला कामधेनू असेही म्हटले जाते. ती जिथे असते, त्या जागेतील ग्रहदोष दूर होतात. सकारात्मक वातावरण तयार होते. शत्रूचा प्रभाव कमी होतो. विजयासाठी अश्व किंवा गाय शुभ मानली जाते. शहरात काळ्या रंगाची कपिला गाय मिळाली नाही. यामुळे खैरे यांनी खास पैठणहून गाय मागविली. लोकसभा निवडणूक होईपर्यंत ही गाय महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयासमोर बांधली आहे.

दररोज केली जाते गायीची पूजा
प्रचार कार्यालयाच्या पूर्व व उत्तर दिशेच्या कोप-यात कपिला गायीसाठी शेड उभारले आहे. येथे सकाळी ८ वाजेच्या आत पूजा केली जाते. याच गायीच्या शेणाने प्रचार कार्यालय प्रवेशद्वारासमोर सारविले जाते.

प्रत्येक निवडणुकीत कपिला गायीची सेवा
१९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे रामकृष्णबाबा उमेदवार होते. त्यांच्या विरोधात खैरे यांनी निवडणूक लढविली व विजयी झाले. त्या निवडणुकीपासून दर लोकसभा निवडणुकीत प्रचार कार्यालयासमोर कपिला गाय बांधत आहेत. ते सकाळीच गायीचे दर्शन घेतात व तिला हरभरा डाळ व गूळ खाऊ घालतात. नंतर प्रचाराला सुरुवात करतात.

प्रचार कार्यालयाची आखणी वास्तुशास्त्रानुसारच
ज्योतिषाच्या सांगण्यानुसार व वास्तुशास्त्रानुसार प्रचार कार्यालयाची आखणी व मांडणी केली आहे. पूर्व आणि उत्तरेच्या कोप-यात (ईशान्य दिशा) परसामध्ये गाय बांधली आहे. पूर्व व दक्षिण कोप-यात (आग्नेय दिशा) विद्युत मीटर बसविले आहे. कार्यालयात आतमध्ये ईशान्य दिशेला देवघर केले आहे. दक्षिण व पश्चिम दिशेच्या (नैऋत्य) कोप-यात तेही टेकाडावर छोटी खोली असून त्यात खैरे यांचे कार्यालय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR