36 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडमाजी आ.गंगाराम ठक्करवाड यांचे निधन

माजी आ.गंगाराम ठक्करवाड यांचे निधन

बिलोली : प्रतिनिधी
देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगाराम ठक्करवाड (वय ८५) यांचे गुरुवारी दि.७ मार्च रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते अंथरुणाला खिळून होते. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांचे ते वडील होत. गंगाराम ठक्करवाड यांच्या पार्थिवावर कासराळी येथील गोशाळेत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आ.गंगाराम ठक्करवाड यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

बिलोली तालुक्यातील कासराळी येथील ग्रामपंचायतीपासून गंगाराम ठक्करवाड यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. कासराळी ग्रा.पं. म्हणजे ठक्करवाड असे समीकरण दृढ झाल्यानंतर तालुका पातळीवरील त्यांची राजकीय वाटचाल सर्वसमावेशक राहिल्याने तब्बल नऊ वर्षे ते बिलोलीचे सभापती व उपसभापतीपदी राहिले. तत्कालीन भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी विचारधारा जुळल्यामुळे भाजपातील एक सक्रिय व्यक्तिमत्व म्हणूनही ते समोर आले. तत्पूर्वी त्यांनी कासराळीमधून सेवा सहकारी सोसायटीची कोनशिला रचल्यामुळे आपल्याभोवती कार्यकर्त्यांची फौज जमवण्यातही यश मिळवले. येथून सुरू झालेली गंगाराम ठक्करवाड यांची ही राजकीय वाटचाल बिलोलीचे उपसभापती, त्यानंतर सभापती व तब्बल २७ वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य व नंतर आमदार अशी चढती राहली. आपल्या मृदू स्वभावामुळे विविध संस्था, शाळा स्थापन करण्याबरोबरच एक मार्गदर्शकाची भूमिकाही त्यांनी अखेरपर्यंत पार पाडली. १९९९ ते २००४ या दरम्यान त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून आमदारकी मिळवत आपल्या संघटनकौशल्याची चुणूक दाखवली.

परंतु वृद्धापकाळामुळे गत वर्षभरापासून ते आजारी असल्याने अंथरुणाला खिळून होते. अखेर गुरुवारी रात्री रात्री ११.३५ वा. त्यांची प्राणज्योत निमाली. गंगाराम ठक्करवाड यांच्या निधनाचे वृत्त कळताच रात्रीपासूनच अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची झाली होती. यावेळी वीरूपाक्ष डॉक्टर शिवाचार्य महाराज मुखेडकर, माजी आमदार सुभाष साबणे, व्यंकट पांडवे, सुभाष गायकवाड, श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्यासह अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. गंगाराम ठक्करवाड यांच्या पार्थिवावर आज (दि.८) सायंकाळी त्यांचे मूळ गाव कासराळी येथे सायंकाळी ५ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.

गंगाराम ठक्करवाड यांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र लक्ष्मण ठक्करवाड यांनी मुखाग्नी दिला. यावेळी वीरूपाक्ष डॉ. शिवाचार्य महाराज मुखेडकर, माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील, खा.डॉ.अजित गोपछेडे, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापुरकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, गंगाधरराव पटने, माजी आमदार सुभाषराव साबणे, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार रोहिदास चव्हाण, बंजारा समाजाचे नेते देविदासराव राठोड, डॉ. धनाजीराव देशमुख, मनोहरराव धोंडे, प्रवीण साले, माजी सभापती संजय बेळगे, प्रवीण पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे, डॉ. मीनलताई खतगावकर, उद्योजक मारोती कंठेवाड, सुरेशराव गायकवाड, माजी प.स.सभापती व्यंकटराव पांडवे, राजेश कुंटुरकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव गायकवाड, श्रीनिवास पाटील चव्हाण, वसंत सुगावे, बालाजी बच्चेवार, माजी सभापती मंगाराणी आंबुलगेकर, मोगलाजी शिरसेटवार, महेश पाटील देगलूरकर, मारोतराव कवळे गुरुजी, आनंदराव बिराजदार, गिरीधर पाटील डाकोरे, दिलीप पाटील धर्माधिकारी, मंगेश कदम, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, चंद्रशेखर पाटील सावळीकर, माजी नगराध्यक्ष यादराव तुडमे, भीमराव जेठे यांच्यासह पंधरा ते वीस हजारावर जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व श्री श्री श्री भीमाशंकर महाराज केदार पीठ यांचा शोकसंदेश आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR