36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयम...मायमराठीचा!

म…मायमराठीचा!

आज जागतिक मराठी भाषागौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानितकवी, साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या २७ फेबु्रवारी या जन्मतारखेला जागतिक मराठी भाषागौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पण एकच दिवस का ? मराठी भाषेचा गौरव वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस व्हायला हवा. अर्थात प्रत्येक वर्षी आपण असेच म्हणतो! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ तिथी आणि तारखेनुसार करण्याऐवजी महाराजांचा उत्सव तीनशे पासष्ट दिवस करायला हवा. मराठी भाषागौरव दिवससंदर्भातही तसेच म्हणायला हवे.

मराठी भाषा दिवस दररोज जल्लोषात साजरा व्हायला हवा. केवळ गौरव करूनच नव्हे तर मराठी भाषा आपण जगली पाहिजे. मराठी भाषा आपण जगलो तरच ख-या अर्थाने ती जगेल, टिकेल आणि वृद्धिंगत होईल. मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन, जतन आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे. सध्या आपल्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा घट्ट बसला आहे. तो झुगारून दिला पाहिजे. आपण दैनंदिन व्यवहारातसुद्धा मराठीचा वापर करीत नाही, ते कमीपणाचे समजतो नि इंग्रजी-हिंदी बोलणे अभिमानास्पद मानतो, स्वत:ला सुशिक्षित समजणारे मराठी भाषिक लोकच तिच्या -हासास कारणीभूत आहेत. भारतात बोलल्या जाणा-या भाषांमध्ये हिंदी, तेलुगू व बंगाली भाषेनंतर मराठीचा चौथा क्रमांक लागतो. सुमारे दीड हजार वर्षाची प्राचीन इतिहास असणारी ही भाषा महाराष्ट्रीय प्राकृताचे आधुनिक रूप आहे. तिच्यावर संस्कृत,पाली, मागधी, महाराष्ट्रीय अशा अनेक भाषांचे संस्कार झाले आहेत. मराठी भाषेचा उगम संस्कृतीच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्रीय बोली भाषेपासून झाला असे म्हटले जाते. कोकणी, देशी, खानदेशी, व-हाडी, मराठवाड्याची ‘दक्षीणी’ या मराठीच्या पोटभाषा मानल्या जातात. पुण्या-मुंबईकडची मराठी प्रमाण मराठी मानले जाते. त्याचप्रमाणे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या महत्त्वाच्या केंद्रांतील भाषासुद्धा प्रमाण मानल्या जातात. पुढे काळाच्या ओघात भाषेवर अनेक परिवर्तने झाली नि समाज जीवनातल्या स्थित्यंतरानुसार मराठीत बदल होत गेले. स्थलानुसारसुद्धा मराठीत अनेक बदल झाले.

त्यातूनच मुख्य मराठी, अहिरानी मराठी, मालवणी मराठी, व-हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले. २१ फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात आला. जागतिक पातळीवर सात हजारांहून अधिक मातृभाषा आहेत. भारतात २२ प्रमुख भाषांसह सुमारे १३०० मातृभाषा आहेत. झपाट्याने होणारे जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि अन्य भाषांनी मातृभाषेवर केलेली कुरघोडी त्यामुळे अनेक मातृभाषा लोप पावत चालल्या आहेत. मातृभाषेचे संवर्धन व्हावे नि त्या भाषेची संस्कृती टिकून राहावी म्हणून १९९९ पासून २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारत जगातील एकमेव राष्ट्र आहे, जिथे सर्वाधिक भाषा बोलल्या जातात. मात्र इथेही काही मातृभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत तर काहींचा व्यवहारात कमी वापर होत आहे. २७ फेब्रुवारीला शाळांतूनही मराठी राजभाषा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. मात्र दिवस सरला की दुस-या दिवशी पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू होते. इंग्रजी भाषेने मातृभाषांवर केलेली घुसखोरी ही मोठी समस्या आहे. इंग्रजीला पर्याय नाही हा मोठा गैरसमज भारतीयांच्या मनात निर्माण झाल्याने आज इंग्रजी आणि कान्व्हेंट शाळामध्ये आपल्या पाल्यांना घालण्याचे प्रमाण वाढले आहे.

शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही हे प्रमाण वाढले आहे. इंग्रजी भाषेचा सराव व्हावा म्हणून घरातही ती संवाद-भाषा बनली आहे. परिणामी मातृभाषा मराठी असूनही या मुलांना मराठी भाषा परकीय वाटू लागते. मराठी भाषेचे सौंदर्य आणि त्यातील पैलू त्यांना कधी उमगतच नाहीत. मातृभाषेतील शब्दभांडार, त्यातील सौंदर्य आणि लेखनसंपदा त्यापासून तरुण पिढी दुरावत चालली आहे. म्हणून मातृभाषेच्या संवर्धनासाठी व्यावहारिक स्तरावर इंग्रजीचे वाढलेले अवास्तव महत्त्व कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य पातळीवर मातृभाषेचा वापर अधिकाधिक व्हायला हवा आणि त्यासाठी पालकांमध्येही जागृती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर मराठी भाषाशुद्धीचे प्रयत्न युद्धपातळीवर केले होते आणि परकीय शब्दांना हद्दपार केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही मराठी भाषेला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, तिचे सौंदर्य खुलविण्यासाठी प्रयत्न केले होते. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नव्या शब्दांची देणगी दिली तसेच जुनेच पण नव्याने व्यवहारात येऊ शकणारे काही प्रतिशब्दही दिले-

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
असे सुरेश भट यांनी म्हटले आहे. त्याची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. नवे शब्द देताना सावरकरांना बरीच टीका सहन करावी लागली. त्यांनी रेल्वे सिग्नलला ‘अग्निरथ गमनागम सूचक ताम्र हरित लोक पट्टिका’ असे नाव दिले होते. आज त्यांनीच रूढ केलेले दूरध्वनी, महापौर, दिनांक, संकलन, चित्रपट आदी शब्द आपण सर्रास वापरतो. कुसुमाग्रजांना इतर भाषांचा दु:स्वास नव्हता परंतु आपल्या काव्यरचनेत ‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’ असे ठणकावून सांगण्यास ते कचरले नाहीत. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांची पीछेहाट होण्यास आपणच कारणीभूत आहोत. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असे नुसते म्हणून काय उपयोग? आपण आपल्या दारावरची पाटीही मराठीत लिहीत नाही. मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी आंदोलन करावे लागते.

दोन मराठी माणसे एकमेकांशी मराठीत बोलत नाहीत! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत पण त्याला यश येताना दिसत नाही. ग्रामीण भागात मराठी भाषेचे ब-यापैकी संवर्धन व जतन होताना दिसते परंतु हळूहळू तिथेही शहरीकरण होताना दिसते आहे. ‘माझा मराठीचि बोलु कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिकें मेळवीन।। ’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. आम्ही कपाळकरंटे मात्र, म…मायमराठीचा म्हणावयासही तयार नाही. हा विरोधाभास आपल्याला रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR