31.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषमॉलसंस्कृतीत अडकलेला ग्राहक

मॉलसंस्कृतीत अडकलेला ग्राहक

भारतात आकारास आलेल्या मॉलने ग्राहकाच्या जीवनशैलीत कायापालट केला असून ही बाब खरी आहे. त्याच वेळी किरकोळ बाजारातील व्यावसायिकांना एकटविण्याचे आणि अधिक संघटित होण्यास मदत मिळाली आहे. परंतु अधिक खर्चिक राहणे ही बाब भविष्यासाठी असुरक्षित राहू शकते.

कसंख्येतील वाढ, अपेक्षांमधील बदल आणि तंत्रज्ञानातील विकासाचा वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर आणि विक्रीच्या शैलीवर परिणाम झाल्याचं दिसून येतं. या संक्रमणात ग्राहकाविषयी व्यक्त होणारा भावनिक ओलावा क्रमश: कमी-कमी झाल्याचं दिसून येत असलं, तरी सेवासुविधांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, हे मान्य करावं लागेल. पूर्वीच्या काळी गल्लीतल्या किराणा दुकानदाराला आपल्या सर्व ग्राहकांची नावं तोंडपाठ असायची. एवढंच नव्हे, तर प्रत्येक ग्राहकाचा नोकरीधंदा काय आहे, त्याच्या घरात किती माणसं आहेत, मुलं काय शिकतात, हेही त्याला ठाऊक असायचं. दुकानात गेलं की घरगुती भाषेत ग्राहकाचं स्वागत होत असे. वर्तमानपत्राच्या त्रिकोणी घडीत डाळ, साखर घेऊन पुड्याच्या दो-यानं बांधता-बांधता घरातल्या वयोवृद्ध, आजारी व्यक्तंच्या तब्येतीची विचारपूस दुकानदाराकडून आस्थेनं केली जायची. मुलांना किती मार्क पडले, हेही तो विचारायचा. नोकरदारांना महिन्यातून एकदाच उत्पन्न मिळतं; मात्र आपल्या दुकानाची पायरी त्याला जवळजवळ रोज चढावी लागते, हे माहीत असल्यामुळं नियमित ग्राहकांची ‘खाती’ दुकानदाराकडे असायची. मालाची यादी घेऊन लहान मुलांना दुकानात पाठवलं जायचं.

दुकानदार त्याच्याकडच्या पिशव्या काउंटरवरून आत घेऊन माल बांधून होईपर्यंत लहान मुलांना चॉकलेट-गोळ्या द्यायचा. ब्रँडेड चॉकलेटांची सवय त्याकाळी मुलांना जडलेली नव्हती. रावळगावचं कडक चॉकलेट, पारलेचं मऊ चॉकलेट, लिमलेटच्या गोळ्या आणि पेपरमिन्ट एवढीच ‘व्हरायटी’ उपलब्ध असायची. मुलं चवीनं चॉकलेट चघळत असताना दुकानदार त्याची थट्टामस्करी करत माल बांधायचा. पिशव्या भरून द्यायचा आणि ‘हळू, कडेकडेनं जा,’ असं कळकळीनं सांगायचा. क्वचित्प्रसंगी दुकानातल्या पो-याकरवी घरपोच सेवाही द्यायचा. फिरते विक्रेते, हंगामी विक्रेते त्याकाळी अधिक असायचे. भाजीपासून कोकणच्या मेव्यापर्यंत, आईस्क्रीम-कुल्फीपासून अगरबत्त्यांपर्यंत अनेक वस्तू घरपोच येत असत. तिथपासून ते मॉल संस्कृतीपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपला बराच काळ गेला आहे. एकेकाळी वेगवेगळ्या सामानासाठी वेगवेगळ्या दुकानावर जावे लागत असत. म्हणजे कपडे घेण्यासाठी वस्रालयात तर किराणा भरण्यासाठी किराणा दुकानात. हळूहळू दुकानाची जागा सुपरबाजार किंवा सुपरमार्केटने घेतली आणि त्याचे स्वरुप एखाद्या जनरल स्टोअर्सप्रमाणे असायचे. या ठिकाणी घरातील लहानसहान वस्तू एकाच ठिकाणी मिळत असत.

हळूहळू हाच सुपरबाजार मॉलमध्ये परावर्तीत झाला. मॉल संस्कृती ही वास्तविक लोकांची मानसिकता लक्षात घेऊन अस्तित्वांत आणली आहे. मॉल हे पूर्णपणे ग्राहकांना आकर्षित करण्याचे केंद्र बनले असून त्यानुसारच रचना करण्यात आली आहे. मॉलबाहेरच खाण्यापिण्याचे स्वादिष्ट पदार्थ, चटपटीत, मसालेदार खाद्य ग्राहकांना अधिक आकर्षित करणारे असतात. मॉल संस्कृती नावानुसार प्रत्येक लहान गोष्टीला व्यापक रुपातून आणि आकर्षक पद्धतीने सादर करत असते. एवढेच नाही तर मॉलचे नाव देखील मोठे आणि उठावदार दिसेल या पद्धतीने लावण्यात येते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या नजरेत मॉलचे नाव कोठूनही दिसते आणि ते नजरेत भरते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि त्याकडे सहजासहजी कोणाचे लक्ष जात नाही आणि ती म्हणजे मॉलला जाण्यासाठी वेळेचे बंधन नसणे. कोणत्याही मॉलमध्ये घड्याळ नसते. यामागचा उद्देश ग्राहकांना वेळेच्या बंधनापासून दूर नेणे. जेणेकरून आपण जेव्हा मॉलमध्ंये पाऊल टाकू तेव्हा आपल्याला वेळेचे भान राहणार नाही. जोपर्यंत आपला खिसा रिकामा होत नाही, तोपर्यत शॉपिंग करण्याची मानसिकता तयार करण्याचे काम मॉलच्या वातावरणाकडून केले जाते.

कधीतरी अनुभव घ्या, आपल्याला शंभर रुपयाचे सामान घ्यायचे असेल तर आपण मॉलमध्ये हजार रुपये खर्च करून परततो. अशावेळी आपण गरज नसलेल्या सामानाची देखील खरेदी करतो. मॉलमधील कमी किंमतीच्या वस्तूच्या मोहात आपण पडतो आणि भविष्यात ती वस्तू कामाला येईल, याचा विचार करुन आपण त्याची खरेदी करतो. अर्थात आपण एक नवीन गरज भविष्यासाठी तयार करत असतो आणि विशेष म्हणजे ती गरज आजतागायत आपल्या यादीत सामील झालेली नसते. मॉल आपल्या खिशातून पैसे कसे काढतो आणि कशा रितीने शंभर रुपयाच्या वस्तूला २०० रुपयांत विकत घेतो किंवा आपण एक पँट खरेदी करण्यासाठी जातो आणि घरी येताना तीन तीन पँट व शर्ट घेऊन येतो, हे गणित देखील समजून घेणे गरजेचे आहे. एखादे सामान आपल्याला बाजारात ४०० रुपयाला मिळते. मॉलमध्ये तीच किंमत हजार रुपयाला दाखविण्यात येते. त्याचबरोबर ५० टक्के डिस्काउंटचा टॅग लावला जाईल.

त्यामुळे त्याची किंमत पाचशे रुपये होईल. या सवलतीने आपण सहजपणे जाळ्यात अडकले जाल. अशाच रितीने आपण ‘फ्री’च्या जाळ्यात अडकतो. वस्तू खरेदी केल्यास एकावर एक फ्री किंवा तीन पँट किंवा शर्ट खरेदीच्या बदल्यात दोन पँट किंवा शर्ट मोफत. अशा प्रकारचा टॅग पाहून कोणीही त्याच्या जाळ्यात अडकतात आणि आता हेच घडत आहे. ग्राहकालाा आपला खिसा रिकामा होत असल्याचे कळतही नाही. कोणताही ब्रँड हा मोफतमध्ये वस्तू देत नाही आणि फायदा झाल्याशिवाय त्याची भरभराट होत नाही. मॉलच्या या संस्कृतीने ब्रँडला फायदा होतोच त्याचबरोबर त्याच्या विक्रीतही वाढ होते. कारण मॉलमध्ये एका शर्टच्या ठिकाणी दोन शर्ट विकले जातात. याप्रमाणे सामानाच्या विक्रीचे देखील एक धोरण असते. त्यात अति महागाच्या वस्तू खरेदीसाठीची असणा-या मानसिकतेचा लाभ उचलला जातो. त्यामुळे मॉल संस्कृती ही लोकांना खर्चिक करत आहे आणि ग्राहकही स्टेट्सच्या नावावर डोळे बंद ठेऊन पैसे खर्च करत राहतात. उरली सुरली कसर क्रेडिट कार्डने भरून काढली आहे. खिशात पैसे नसले तरी चिंता करण्याचे कारण नाही. प्लॅस्टिक मनी आपल्याला आज खर्च करा, उद्या पैसे भरा याचा पर्याय देत आहेत. परंतु किती खर्च? मॉलमध्ये गेल्यानंतर त्याला मर्यादाच राहत नाही.

भारत अध्यात्मिक आणि घडामोडींनी व्यापलेली भूमि आहे. विकासासाठी सजग आहे. मॉल संस्कृती हे एक छोटे उदाहरण आहे. हे कमर्शियल भवन केवळ आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी युद्धाचे मैदान तयार करत नाही तर लोकांना स्वयंप्रेरणेतून आणि मूल्य व्यवस्थेविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज करतो. भौतिकवाद आणि ठोक बाजाराची क्रांतीच्या अस्थिर प्रवाहात वाहत जाणारा आम आदमी निरंक केला जातो. अगदी ‘गोड विष’ घेण्यासाठी त्याला तयार केले जात आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे मर्यादा पाळली जात नसल्याने दैनंदिन जीवनाचा आनद आणि समाधान हिरावण्याचे काम करत आहे.

मॉल संस्कृतीने भारतीय खरेदीच्या पद्धतीने क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे, असे आपण म्हणू शकतो. एखाद्या दुकानात उन्हाच्या तीव्र झळा सहन करत खरेदी करण्याऐवजी वातानुकुलीत मॉलमध्ये खरेदीचा आनंद लुटला जात आहे. तरुण मंडळी याकडे प्रतिष्ठा म्हणून पाहत आहेत. मॉलमध्ये खरेदी केल्याने ग्राहकांना चांगले, गुणवत्तापूर्ण ब्रँडेड उत्पादन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होते आणि त्यामुळे आत्मिक समाधान लाभते. काही तरुण तर फुशारक मारण्यासाठी मॉलमध्ये जातात. परंतु देशातील शॉपिंग मॉलने भारतात नवीन संस्कृतीला जन्म दिला आहे. ही संस्कृती आपल्या पारंपरिक खरेदी संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. भारतात उत्पन्न वाढल्याने बाजारपेठ क्षेत्रात लोकांना काम करण्याची संधी नव्याने उपलब्ध होत आहे.

-सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अ.भा.ग्राहक पंचायत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR