32.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ५५.३५ टक्के मतदान

राज्यात ५५.३५ टक्के मतदान

पहिला टप्पा, गडकरी, मुनगंटीवार यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक व भंडारा-गोंदिया या ५ मतदारसंघांत शांततेत मतदान पार पडले. सूर्य आग ओकत असतानाही ५५.३५ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत ते कमी आहे. त्यामुळे याचा कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार याबाबत तर्क सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज २१ राज्यातील १०२ मतदारसंघांबरोबर महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांत मतदान शांततेत पार पडले. मतदान यादीत नाव नसल्याच्या तक्रारी व त्यावरून झालेला गोंधळ वगळता मतदान शांततेत पार पडले. राज्यात सध्या उष्णतेची लाट असून ४०-४२ डिग्री तापमानात लोक मतदानाला बाहेर पडतील की नाही, याची चिंता उमेदवारांना पडली होती. सकाळच्या सत्रात ब-यापैकी मतदान झाले; परंतु दुपारी मात्र अनेक ठिकाणी तुरळक मतदार दिसत होते. मतदारांना विनवणी करून केंद्रापर्यंत आणण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू होती. पहिल्या टप्प्यात ५ मतदारसंघांत ९५ लाख ५४ हजार ६६७ मतदार होते. त्यातील सुमारे ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी तब्बल १ लाख ४१ हजार नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यांच्यामध्ये मात्र उत्साह दिसला.

२०१९ चा निवडणुकीत भाजपाने विदर्भातील १० जागांपैकी ९ जिंकल्या होत्या; परंतु या वेळी सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात काट्याची टक्कर झाली. नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराला काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी चांगली लढत दिली. रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचितचे किशोर गजभिये यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यामुळे वंचितला मिळालेली मते निर्णायक ठरणार आहेत. प्रफुल्ल पटेल महायुतीत सहभागी झाल्यामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी असेल, असे अनेकांना वाटत होते; परंतु काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांनी विद्यमान खासदार सुनील मेंढे (भाजपा) यांचा घाम काढला तर गडचिरोली-चिमूर येथे अशोक नेते (भाजपा) विरुद्ध नामदेव किरसान (काँग्रेस) यांच्यातील लढत अंतिम टप्प्यात भलतीच रंगतदार झाली आहे.

मतदारसंघनिहाय सरासरी मतदान
रामटेक ५२.३८ टक्के
नागपूर ४७.९१ टक्के
भंडारा-गोंदिया ५६.८७ टक्के
गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के
आणि चंद्रपूर ५५.११ टक्के

देशात सरासरी ६० टक्के मतदान
देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात आज शांततेमध्ये मतदान पार पडले. तब्बल ६० टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या दोन राज्यांतील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत ही प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आले. येथे ७७.५७ इतके मतदान झाले. त्यानंतर त्रिपुरामध्ये ७६.१० टक्के तर पुद्दुचेरीत ७२.८४ टक्के मतदान झाले.

राज्यात गडचिरोलीत
सर्वाधिक मतदान
महाराष्ट्रात ५ मतदारसंघात मतदान झाले. येथील मतांची टक्केवारी ५५.२९ इतके आहे. यात सर्वात कमी नागपुरात ४७.९१ टक्के तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ६४.९१ इतके मतदान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR