27.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र१० वर्षांत २५ कोटींवर लोक गरिबीतून बाहेर

१० वर्षांत २५ कोटींवर लोक गरिबीतून बाहेर

वर्ध्यात पंतप्रधान मोदींनी दिली सर्वांगीण विकासाची ग्वाही
वर्धा : प्रतिनिधी
गेल्या १० वर्षांत २५ कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ११ कोटी लोकांना नळ कनेक्शन दिले. ४ कोटी लोकांना आवास योजनेचा लाभ दिला. प्रत्येक गावांत वीज पोहोचवली. आता २०२४ ची निवडणूक विकासासाठी आहे. विकसित भारताचे स्वप्न महात्मा गांधी यांनी पाहिले होते. देशाच्या निर्णायक क्षणी वर्ध्याचे आशीर्वाद हवे आहेत. विकसित भारताचे लक्ष आता फार दूर राहिलेले नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामदास तडस आणि अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी वर्धा येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. वर्धा ही संतांची भूमी असल्याचे मोदी म्हणाले. मी भाग्यशाली आहे, मला वर्ध्यात यायला मिळाले, असे मोदी म्हणाले.१० वर्षात आम्ही २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. ११ कोटी लोकांना पाण्याचे कनेक्शन दिले. ४ कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला. ५० कोटीहून अधिक लोकांना बँकेशी जोडण्यात आले. प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे काम केले. २०१४ आधी देशात नैराश्याचे वातावरण होते, असे मोदी म्हणाले.

ज्यांना कोणी विचारले नाही. त्यांना या गरिबाच्या मुलाने पुजले आहे. गॅरंटीसाठी हिंमत लागते. पुढील पाच वर्षात ३ कोटी नवीन घरे हे आमच्या जाहीरनाम्यात आहे. गॅरंटी हा फक्त शब्द नाही तर प्रत्येक क्षणासाठी केलेले प्रयत्न आहेत. ७० वर्षावरील लोकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, कितीही अडचणी आल्या तर गॅरंटी पूर्ण करणार, असे आश्वासन मोदींनी दिले.

मुलींना ड्रोन पायलट करणार
गावागावांतील मुलींना ड्रोन पायलट करणार आहोत. ३ कोटी महिलांना लखपती दिदी करणार, बारशाले गेला अन् बाराव्याला आला, काँग्रेसच्या या धोरणामुळे शेतकरी मागास आहेत, अशी टीका त्यांनी केली. आमचे विदर्भाच्या विकासावर बारीक लक्ष आहे. काँग्रेस काळात विदर्भ मागास होता. आता रस्ते आणि रेल्वेचे जाळे विदर्भात असल्याचे मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR