36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरशहरासह ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी केवळ ३५ रुग्णवाहिका

शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी केवळ ३५ रुग्णवाहिका

सोलापूर : शासनाच्या निकषांनुसार ग्रामीण भागात एक लाख लोकसंख्येसाठी १०८ची एक तर शहरी भागात दोन लाख लोकसंख्येसाठी एक रुग्णवाहिका अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या आता अंदाजे ४३ लाखांहून अधिक असतानाही सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी केवळ ३५ रुग्णवाहिका आहेत. यात आणखी १८ रुग्णवाहिकांची गरज आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. सध्या या ठिकाणी कंत्राटी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बा रुग्ण, आंतररुग्ण व अपघात विभाग सुरू झाले आहेत.

पण, २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाकडे (१०० खाटा महिला व शिशू रुग्णालय आणि १०० खाटा सर्वोपचार रुग्णालय) स्वत:च्या अवघ्या दोन रुग्णवाहिका असून त्याला पण चालक नाहीत . गरज भासल्यास दुसरीकडून चालक बोलावून घेतले जातात, असे सूत्रांनी सांगितले. सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील खाटांची क्षमता अंदाजे ७०० आहे, तरीपण त्याठिकाणी नेहमीच एक हजारापर्यंत रुग्ण असतात. सोलापूरसह परजिल्ह्यातून व परराज्यातूनही त्याठिकाणी रुग्ण येतात. आता जिल्हा रुग्णालय सुरू झाल्यामुळे शहर-जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. पण, लोकापर्णानंतरही त्याठिकाणी संपूर्ण क्षमतेने रुग्णसेवा सुरू नाही. चिंतेची बाब म्हणजे २०० खाटांच्या या रुग्णालयाकडे अवघ्या दोन रुग्णवाहिका असून त्यासाठी चालक अजूनही भरलेले नाहीत.

पदभरतीची प्रक्रिया असते, त्यानुसार कार्यवाही सुरू असून काही दिवसात चालक मिळतील, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याची लोकसंख्या वाढल्याने १०८ रुग्णवाहिका कमी आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन जास्त, अशी सद्य:स्थिती आहे. त्यातच पुन्हा जिल्हा रुग्णालयाकडील रुग्णवाहिका सध्यातरी चालकाविनाच आहेत. नूतन जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन काही दिवसांत सुरू होईल अशी आशा आहे. प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटर सुरू करण्यापूर्वी त्याठिकाणी संपूर्ण निर्जंतुकीकरण अपेक्षित असून त्यासंबंधीचे आणखी दोन रिपोर्ट यायचे आहेत. ते अहवाल आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील प्रसुती शस्त्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. तर जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही कामे थांबली असल्याचेही सांगण्यात आले. आता जिल्हा रुग्णालयाकडे पुरेशा रुग्णवाहिका नसल्याने १०८ रुग्णवाहिकेवरील ताण आणखी वाढणार आहे.

जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक तर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांसाठी देखील प्रत्येकी एक, अशा १०२ च्या एकूण ९४ रुग्णवाहिका आहेत. १०२ या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्याठिकाणी रुग्णसेवा केली जाते. पण, गर्भवती माता व एक वर्षापर्यंतच्या गंभीर आजारी बालकांनाच या रुग्णवाहिकेची सेवा मिळते. इतर रुग्णसेवेसाठी या रुग्णवाहिकांना इंधन मिळत नाही, असे जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR