40.8 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूर११ दिवसांनंतर निघाला सौदा

११ दिवसांनंतर निघाला सौदा

लातूर : प्रतिनिधी
व्यापा-यांकडील हमालांच्या हमाली दराच्या वाढीसाठी हमाल संघटनांनी गेली ११ दिवस काम बंद आंदोलन केले. लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील खरेदी दाराकडील हमाली १६ टक्के वाढ देण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत झाला. त्यामुळे तब्बल ११ दिवसा नंतर बुधवार दि. २४ एप्रिल रोजी लातूर बाजार समितीच्या परिसरात शेतमालाचे सौदे निघाले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
आडतीवर काम करणा-या हमालांच्या मजूरीच्या दरात महागाईनुसार २०२० साली वाढ होणे आवश्यक असताना कामगारांच्या मजूरीच्या दरात वाढ झाली नाही. प्रशासक काळात धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने हा विषय रखडला. मजूरीत वाढ करावी म्हणून दि. २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, हमाल मापाडी गाडीवान संघटना, लोकसेवा माथाडी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. लातूर बाजार समितीने १५ दिवसात यावर समन्वयाने तोडगा काढू असे आश्वासन दिल्याने आडत बाजारातील व्यवहार सुरू झाले होते.
मात्र आश्वासन देऊन ४० दिवस झाले तरी हमालांच्या हमाली दरवाढीचा विषय मार्गी न लागल्याने पुन्हा शनिवार पासून हमालांनी काम बंदचे हत्यार उपसल्यामुळे शनिवार दि. १३ एप्रिल पासून आडत बाजारात शेतमालाचा सौदा न निघाल्याने कोटयावधी रूपयांचे व्यवहार ठप्प राहिले. मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील खरेदी दाराकडील हमालीत १६ टक्के वाढ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दि. २४ एप्रिल पासून तब्बल ११ दिवसांनी लातूर बाजार समितीचे खरेदी व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बुधवारी आडत बाजार सुरू झाल्याने ८९ क्विंटल गव्हाची आवक होऊन सर्वाधिक ३ हजार ८२० रूपये दर मिळाला. ज्वारी हैब्रीडची ५२ क्विंटल आवक होऊन २ हजार ३०० रूपये सर्वाधिक दर मिळाला. रब्बी ज्वारीची १६९ क्विंटल आवक होऊन ३ हजार ३०० रूपये दर मिळाला. पिवळी १५५ क्विंटल आवक होऊन ३ हजार ९४० रूपये दर मिळाला. हरभ-याची ७ हजार ४१५ क्विंटल आवक होऊन ६ हजार ८०० रूपये दर मिळाला. तूरीची २ हजार १४४ क्विंटल आवक होऊन १२ हजार रूपये सर्वाधिक दर मिळाला. १४ हजार ७८५ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ४ हजार ६९४ रूपये सर्वाधिक दर मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR