32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूर१९ गावांमध्ये २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू

१९ गावांमध्ये २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू

सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, सध्या १९ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गाव प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली असून, गावातून मागणी आल्यानंतर प्रशासनाने १९ गावांमध्ये २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

माळशिरस, माढा, करमाळा, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या पाच तालुक्यांतील १९ गावांसाठी २१ टँकरने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहराला लागून असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावात ३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. माळशिरसमध्ये भांब, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, फडथरी शिवारवस्ती, फडथरी निटवेवाडी, कोथळे, बचेरी, माढामध्ये तुळशी, करमाळ्यात घोटी, साडे, आळसुंदे, फिसरे, सालसे, निबोरे, रायगाव. मंगळवेढ्यात येड्राव तसेच दक्षिण सोलापूरमध्ये कुंभारी गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सोलापूरच्या तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. सध्या कमाल तापमान ४० तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. दुपारी कडक ऊन, सायंकाळी गारवा अन् पहाटे थंडी असा तिहेरी हवामानाचा अनुभव सोलापूरकर घेत आहेत.

वाढत्या उष्णतेमुळे बोअर व विहिरीमधील पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात सध्या नवीन बोअर घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ३०० ते ४०० फूट खोलवर पाणी लागत असल्याचे सांगण्यात आले. यंदा अधिकच पाणीटंचाई जाणवणार असल्याचे बोलले जात आहे. उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा मायनस २८.१७ वर पोहोचला आहे. मागील वर्षी ५९.७२ एवढा पाणीसाठा होता. शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा, हिप्परगा तलावातील पाणीसाठाही हळूहळू कमी होत चालला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR