36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयलाव रे तो व्हीडीओ...!

लाव रे तो व्हीडीओ…!

प्रेमात आणि युद्धात सारे काही माफ असते असे म्हणतात, त्यात आता राजकीय क्षेत्राचाही समावेश करण्यात येऊ लागला आहे. राजकीय क्षेत्रात सर्कशीतील कलाकारांना लाजवतील अशा कोलांटउड्या मारल्या जातात, कबड्डी, खो-खो, सूरपारंब्या असे भारतीय खेळ खेळले जातात. राजकारणात कालचा शत्रू आज मित्र बनल्याचे पहावयास मिळते. खच्चून विरोध करणारे विरोधक सत्ताधा-यांच्या मांडीवर कधी जाऊन बसतील ते सांगता येत नाही. राजकारणात कधी काय घडेल ते ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. राजकीय नेते आपली टोपी कधी फिरवतील ते सांगता येत नाही. सत्तासुंदरीसाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. निवडणुका जाहीर झाल्या की राजकारणातील खेळाला खरा रंग चढतो. सध्या असेच ‘राज’कारण रंगते आहे, देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे मनसेदेखील लवकरच महायुतीत सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास महायुतीकडून मनसेला दोन-तीन जागा मिळू शकतात आणि त्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) पोटात गोळा उठू शकतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समावेशाचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय अमित शहा प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला भेट देत नाहीत असे सांगितले जाते.

परंतु त्यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राज ठाकरेंचे आदरातिथ्य केल्यामुळे मनसेची रालोआतील प्रवेशाची घोषणा ही केवळ औपचारिकता उरल्याचे मानले जात आहे. त्यामुळे गत निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हीडीओ’ असे सांगत प्रचाराची राळ उडवणारे राज ठाकरे उद्या भाजपच्या व्यासपीठावर दिसल्यास आश्चर्य वाटू नये. राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले तेव्हा त्यांच्याबरोबर ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस आणि ‘बोलघेवडे’ बावनकुळे होते. राजकारणात एखादा नेता एखादी कृती करतो तेव्हा त्याच्या पक्षातील अन्य नेते आपल्या नेत्याची री ओढण्यासाठी धाऊन येतात. राज ठाकरे हे मराठी माणसाच्या हिताचा, हिंदुत्वाचा आणि पक्षाचा विचार करूनच योग्य निर्णय घेतील, असे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. तसेच बाळा नांदगावकर दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

त्यामुळे मनसे भाजपशी हातमिळवणी करत महायुतीत सहभागी होईल हे निश्चित मानले जात आहे. राज ठाकरे भाजपबरोबर जाणार हे निश्चित मानले जात आहे. कारण गत चार दिवसांत दोन वेळा त्यांची दिल्लीवारी घडली आहे. मनसेच्या अठराव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काही सूचक वक्तव्ये केली होती. ‘कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मला स्वत:ची पोरं अंगाखांद्यावर खेळवायची आहेत. मी दुस-यांची पोरं अंगाखांद्यावर खेळवणार नाही. महाराष्ट्रात आपणच सत्तेवर येऊ’ असे म्हणाले होते. राज ठाकरे यांनी ज्या भाजपवर इतर राजकीय पक्ष व नेत्यांची तोडफोड तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा आणल्याचा आरोप केला होता, त्याच महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतील का अशी चर्चा होत आहे. तसे झाल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांना भाजप आणि महायुतीचा प्रचार करावा लागेल.

लोकसभेत मनसेला किती जागा मिळतील, त्यातून मनसेला काय लाभ होईल, मनसेच्या मदतीने भाजप व महायुतीच्या अन्य पक्षांना किती लाभ होणार हा राजकीय चर्चेचा विषय आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर दिल्लीवारीवरून टीका करणा-या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच स्वत:च दिल्लीवारी केली हा टोकाचा विरोधाभास म्हणावा लागेल. राज ठाकरे यांची महायुतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यांचा भाजपला, महायुतीला प्रासंगिक लाभ होऊ शकेल. कारण उद्धव ठाकरे यांचा झंझावात रोखण्यासाठी त्यांना राज ठाकरे उपयोगी पडू शकतात पण महायुतीत जाऊन राज ठाकरे यांच्या पदरात काय पडणार हा मोठा प्रश्न आहे. मुळात महायुतीत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप हे तीन मोठे पक्ष असताना त्यांना चौथ्या पार्टनरची गरजच का भासली हा प्रमुख प्रश्न आहे. याचा अर्थच असा की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी प्रचाराचा जो झंझावात निर्माण केला आहे तो रोखणारा प्रभावी नेता महायुतीकडे नाही. महाविकास आघाडीला रोखण्याच्या कामात अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा फारसा उपयोग होत नसल्याने ऐनवेळी चौथ्या पार्टनरला घेण्याचा प्रयत्न भाजपने केला असावा.

मात्र असे केल्याने ‘टू मेनी कुक…’ होऊ शकते हा धोका भाजपच्या लक्षात आला की नाही कोण जाणे! मुळात आधीच्या तीन पक्षांतील जागावाटपाचा तिढा कायम असताना आता मनसेला आपल्यात घेऊन त्यांना नेमक्या किती जागा दिल्या जाणार हा महत्त्वाचा गहन प्रश्न आहे. मनसेला एक-दोन जागा देऊन त्यांची बोळवण केली जाण्याची शक्यता आहे. मनसेपुढे आज अस्तित्वाचा प्रश्न आहे. अशा स्थितीत एकटे राहून पुन्हा पराभवाचा सामना करण्यापेक्षा स्पर्धेत राहून आपले अस्तित्व टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. म्हणूनच त्यांनी आपल्या ‘एकला चलो रे’ तत्त्वाला तिलांजली दिली असावी. सध्या तरी मनसेचे इंजिन महायुतीच्या रुळावरून धावणार असे दिसते, मात्र ते तुफान वेगात धावेल की रुळावरून घसरेल ते मतदारच सांगू शकतील. ‘दुस-याची पोरं किती दिवस कडेवर घेणार?’ असा सवाल करणारे राज ठाकरे आज स्वत:च भाजपच्या कडेवर बसण्यास उत्सुक आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील पोरखेळ पाहून मतदार वैतागले असतील. ते म्हणत असतील- आम्ही बघतोय ना!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR