34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यादुस-या टप्प्यात ८८ जागा, १,२१० उमेदवार

दुस-या टप्प्यात ८८ जागा, १,२१० उमेदवार

लढत । केरळमध्ये ५०० तर राज्यातील २०४ जणांच्या भवितव्याचा फैसला २६ तारखेला होणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात ८८ जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून एकूण १,२१० उमेदवार आखाड्यात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. या टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक २० जागांसाठी ५०० उमेदवार आहेत. त्याखालोखाल कर्नाटकमधील १४ जागांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात आहेत.

दुस-या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. ८८ जागांसाठी २,६३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील १,४२८ अर्ज वैध ठरले होते. आता एकूण १,२१० उमेदवार शिल्लक राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या प्रमुख नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यात काँग्रेसचे राहुल गांधी, डाव्या आघाडीच्या अ‍ॅनी राजा आणि भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांचा समावेश आहे. हे तिघेही वायनाड मतदारसंघातून उभे आहेत. याशिवाय तिरुवअनंतपूरम मध्ये कॉँग्रेसचे शशी थरुर, भाजपचे राजीव चंद्रशेखर आणि डाव्या आघाडीचे पी. रवींद्रन अशी तिहेरी लढत होत आहे. राजस्थानमधील कोटा मतदारसंघात मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, जोधपूरमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत तर चित्तोडगडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांचे भवितव्य ठरणार आहे.

बिहार, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, त्रिपुरा, छत्तीसगड, आसाम, जम्मू काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, प. बंगाल आणि आउटर मणिपूर या ठिकाणी दुस-या टप्प्यात २६ तारखेला मतदान होणार आहे. आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट १३ विधानसभा मतदारसंघात २६ तारखेलाच मतदान होणार आहे.

८ जागा : २०४ उमेदवार
महाराष्ट्रातील ८ जागांसाठी याच दुस-या टप्प्यात मतदान होईल. यासाठी एकूण ४७७ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर २९९ अर्ज वैध ठरले होते. अर्ज मागे घेतल्याच्या शेवटच्या तारखेनंतर या आठ जागांसाठी २०४ उमेदवार निवडणूक आखाड्यात उभे आहेत. राज्यातील ज्या आठ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR