40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीय विशेषराजस्थानात काँग्रेसचे ‘महिला कार्ड’

राजस्थानात काँग्रेसचे ‘महिला कार्ड’

राजस्थानात काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा राजकीय डाव खेळला आहे. पक्षाने सत्ता राखण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेस वार्षिक दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर राजस्थानातील एक कोटी पाच लाख कुटुंबांना पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर देण्याची हमी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर बहिणीचा आशीर्वाद घेतात. राजस्थानात ज्येष्ठ महिला म्हणजे ६० ते ९९ वयोगटातील महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या राज्यातील राजकारण करताना राजकीय पक्ष महिलांचे लांगुलचालन करताना दिसतात.

जस्थानात काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा राजकीय डाव खेळला आहे. पक्षाने सत्ता राखण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेस वार्षिक दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर राजस्थानातील एक कोटी पाच लाख कुटुंबांना पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर देण्याची हमी दिली आहे. सध्या केवळ उज्ज्वला योजनेनुसार लाभार्थ्यांना पाचशे रुपयांतच गॅस सिलिंडर मिळत आहे.
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा असणारा संघर्ष याहीवेळेस पाहावयास मिळत आहे. भाजप काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशावेळी महिलांसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणा हा मोठा राजकीय डाव मानला जात आहे.

  • मोदी सरकारवर प्रियंकाचा हल्लाबोल
    काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या झुंझुनू येथील सभेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दोन घोषणा केल्या. यावेळी सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रखर हल्ले केले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांतून रोजगार निर्मिती व्हायची. मात्र या कंपन्या सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांना विकण्याचे कारस्थान रचले आहे, असा आरोप केला. त्या म्हणाल्या, ‘‘मोदी सरकारच्या बोलण्यात काही दम नाही. महिला आरक्षणावरून मोठमोठी आश्वासने दिली. मात्र सत्य सर्वांनाच ठाऊक आहे. ग्रामपंचायतीत काँग्रेसने महिलांना आरक्षण सर्वांत अगोदर दिले. संसदेत महिलांना आरक्षणासाठी कायदा केला, मात्र तो कधी लागू होणार आहे, त्याची माहिती कोणालाच नाही.’’

कर्मचा-यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत
प्रियंका म्हणाल्या, काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची हमी दिली आहे. राज्य कर्मचा-यांच्या हितासाठी उचललेले हे पाऊल भाजपला मात्र मान्य नाही. केंद्र सरकारकडे कर्मचा-यांना देण्यासाठी पैसे नाहीत. मात्र त्यांनी आपल्या सोयी सुविधांसाठी १६ हजार कोटी रुपयांत दोन विमानांची खरेदी केली. कर्मचा-यांना देण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत, मात्र संसद भवनाची नवी इमारत उभारण्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले. निवडणूक येताच सर्व नेते भाषण ठोकून निघून जातात. कधी कधी सर्वच नेते सारखेच बोलत आहेत, असे वाटू लागते. आम्ही त्यांच्यावर आरोप करतो आणि ते आमच्यावर आरोप करतात. यापेक्षा एकाच व्यासपीठावर सर्वांचा एकत्र परिसंवाद ठेवला तर बरे होईल. दूध का दूध पानी का पानी होईल.

अनेक नेते काँग्रेसमध्ये
झुंझुनूच्या सभेवेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी प्रियंका गांधी यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ममता शर्मा यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. किशनगड येथील भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणारे विकास चौधरी यांनी देखील काँग्रेसच्या धोरणावर विश्वास ठेवत पक्ष सदस्यत्व स्वीकारले. धौलपूरच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मत दिल्यानंतर भाजपकडून कुशवाह यांची हकालपट्टी झाली होती. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी सक्रिय आहेत. त्यांनी राज्यात दोन ते तीन सभा घेतल्या आहेत. प्रियंका गांधींच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

निवडणुकीपूर्वी गेहलोत यांनी घेतले बहिणीचे आशीर्वाद
मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर बहिणीचा आशीर्वाद घेतात आणि शुभ संकेत म्हणून बहिणीकडून एक पाकीटही घेतात. त्यात काही रक्कम असते. याबाबत असे म्हटले जाते, की चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या उद्देशातून अशोक गेहलोत हे याहीवेळेस बहिणीच्या घरी गेले. थोरली बहीण विमला देवी यांचे लहान भावावर खूप प्रेम आहे. बहीणही लहान भावाला निवडणुकीत जिंकण्यासाठी आशीर्वाद देते. त्यामुळे गेहलोत देखील बहिणीला लकी मानतात. पण यावेळी बहिणीचे पाकीट लकी ठरते की नाही, हे पाहावे लागेल. गेल्यावर्षी देखील राखीपौर्णिमेच्या काळात गेहलोत हे मोठ्या बहिणीच्या घरी गेले आणि त्यांनी राखी बांधून घेतली होती. प्रत्येक वर्षी राखीपौर्णिमेला गेहलोत हे बहिणीकडून राखी बांधून घेतात.राजस्थानात प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तांतराचा ट्रेंड राहिला आहे. २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला तेव्हा दोन्ही पक्षांतील मतांचा फरक केवळ दहा टक्के होता. तेव्हा काँग्रेसला केवळ २१ जागा मिळाल्या तर भाजपला १६३ जागा. हे प्रचंड बहुमत होते. मात्र २०१८ मध्ये सत्तांतर झाले आणि निवडणुकीत काँग्रेसने ३९.३ टक्के मतांसह १०० जागा जिंकल्या. त्याचवेळी भाजपला ३८.७ टक्क्यांसह ७३ जागा मिळाल्या. बसपने सहा जागा जिंकल्या. अशावेळी या निवडणुका भाजप आणि काँग्रेससाठी खूप महत्त्वाच्या आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर कोणता पक्ष प्रबळ आहे, याचे संकेत मिळणार आहेत. अर्थात भाजप आणि काँग्रेससमोर आव्हाने भरपूर आहेत. पक्षातील कलह सार्वजनिक आहे आणि ‘अँटीइन्कम्बसी’ची परंपरा देखील.

राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ महिला म्हणजे ६० ते ९९ वयोगटातील महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. याशिवाय ९० ते ९९ वयोगटातील महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत तीन पट अधिक आहे. राजस्थानात यावेळी ५ कोटी २६ लाख ८० हजार ५४५ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी २ कोटी ७३ लाख ५८ हजार ६२७ मतदार पुरुष आणि दोन कोटी ५१ लाख ७९ हजार ४२२ महिला मतदार आहेत. यापूर्वी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ४ कोटी ७७ लाख ८९ हजार मतदार होते. यात २ कोटी ४९ लाख ८९ हजार पुरुष आणि २ कोटी २८ लाख २७ हजार महिला मतदार होते. अशावळी महिलांचे मुद्दे आणि हमी या गोष्टी प्रचारात महत्त्वाच्या ठरत आहेत. या कारणांमुळेच केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक पाच राज्यांच्या निवडणुकीच्या अगोदर संसदेत आणले.

-संगीता चौधरी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR