36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयपुन्हा घोडेबाजार!

पुन्हा घोडेबाजार!

राजकारणाचे डाव हे मैदानात कमी आणि मैदानाबाहेर जास्त टाकले जातात, त्यातून विरोधकांना मानसिकदृष्ट्या पराभूत करण्याचा प्रयत्न होतो. त्यात यश आले की, लढाईला तोंड फुटण्यापूर्वीच अर्धी लढाई जिंकता येते. विद्यमान सत्ताधा-यांना तर हा मंत्र व त्याचे तंत्र अत्यंत चांगल्या प्रकारे अवगत आहे. मागच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षांना त्याचे प्रत्यंतर घडवलेच आहे. आताही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप याच तंत्राचा मुक्त हस्ते वापर करत आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला कमकुवत करण्याचे हरत-हेचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून मुक्त हस्ते सुरू आहेत. त्यासाठी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून गळाला लावले जात आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणेचा वापर सुरू आहेच.

त्यातून विरोधी पक्षातील नेते फोडणे किंवा पक्षच फोडणे सुरू आहे. या सगळ्यातून लोकसभा निवडणुकीपूर्वीच हरत-हेने विरोधकांचे शक्य तितके खच्चीकरण करण्याचे भाजपचे प्रयत्न स्पष्ट आहेत. अर्थात विरोधकांना हे कळत नाही, असे अजिबात नाही. भाजपचा इंडिया आघाडी कमकुवत करण्याचा डाव उधळून लावण्यासाठीच काँगे्रसने मन मोठे करून समाजवादी पार्टी व आम आदमी पार्टी यांच्यासोबत जागावाटप निश्चित केले व ऐक्यासाठी काँग्रेस त्यागास तयार असल्याचा संदेश दिला. त्याला भाजप प्रत्युत्तर देणार हे उघडच होते. त्याला तोंड देण्याची तयारी इंडिया आघाडीने करायला हवी होती. मात्र दुर्दैवाने त्यात इंडिया आघाडी कमी पडली असेच राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून म्हणावे लागते. भाजपने राज्यसभेसाठीच्या ज्या १५ जागांसाठी मतदान झाले त्यात काँग्रेस व सपा या दोन्ही पक्षांच्या वाट्याची प्रत्येकी एक जागा खेचून घेतली. या १५ जागांपैकी १० जागा भाजपला, ३ जागा काँग्रेसला तर २ जागा सपाला मिळाल्या. यासाठी घोडेबाजार झाला असणार हे उघडच पण त्याचा विधिनिषेध आता कुठल्या पक्षाला राहिला आहे,

हा संशोधनाचा प्रश्न! उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेस व सपाला धक्का दिला. तर कर्नाटकात काँग्रेसने भाजपला धक्का दिला. भाजपने त्यावरून आदळआपट सुरू केली असली तरी आपल्या डावाला कधी तरी प्रतिडावाने उत्तर मिळणार हे गृहित धरायलाच हवे! असो! मात्र, या घोडेबाजाराने भाजप राज्यसभेत ११७ च्या संख्याबळावर पोहोचला आहे. आणि बहुमतासाठी रालोआला आता अवघ्या चार जागा कमी आहेत. ही आकडेवारी विरोधी पक्षांची चिंता वाढवणारी आहे हे भाजपलाही ज्ञात आहेच. त्यामुळेच भाजपने लोकसभेच्या रणांगणापूर्वी राज्यसभेत विरोधकांना धक्का दिला आहे. हिमाचल प्रदेशात विधानसभेत काँग्रेसचे ४० आमदार आहेत. तेथे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पराभवाचे काहीच कारण नव्हते. मात्र, हिमाचलमधील काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराकडे पाठ फिरवली व भाजपचा उमेदवार निवडून आला. त्यावरून भाजपने सुखविंदर सिंग सुक्खू यांचे सरकार अल्पमतात आल्याचा दावा आता केला आहे. भाजपच्या १५ आमदारांना निलंबित करून अर्थसंकल्प मंजूर करून घेत सुक्खू यांनी आपले सरकार तूर्त वाचवले असले तरी पक्षांतर्गत नाराजी दूर न झाल्यास त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकणार का? असाच प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसने दोन वरिष्ठ नेत्यांना तातडीने राज्यात पाठवून ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केल्याने तूर्त काँग्रेसचे सरकार किमान तीन महिने तरी तरणार आहे. मात्र, भाजपने मागच्या राज्यसभा निवडणुकीत जो प्रयोग महाराष्ट्रात केला तसाच प्रयोग आता हिमाचल प्रदेशात केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अगदी ठरवून काँग्रेसला हा धक्का दिला आहे. तर उत्तर प्रदेशात आपल्या संख्याबळापेक्षा एक खासदार अधिकचा निवडून आणून या राज्यात आकाराला आलेल्या सपा-काँगे्रस आघाडीला धक्का दिला आहे. राज्यसभेतील या अप्रत्यक्ष निवडणुका व त्याचे निकाल हा काही प्रत्यक्ष जनतेचा कौल नसतोच. मात्र, या निकालाचा वापर करून विरोधकांच्या पराभवाचे चित्र निर्माण करायचे व आपल्या विजयाची हवा तयार करायची, या प्रपोगंडा खेळात भाजप तरबेज आहेच! त्यामुळे उत्तर प्रदेशातील विजयी भाजप उमेदवार सुधांशू त्रिवेदी यांनी लगोलग पक्षप्रवक्त्याच्या आवेशात राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ८० लोकसभा जागांवर भाजप विजयी होईल व ‘अब की बार चारसौ पार’चा नारा प्रत्यक्षात उतरेल असा दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षपणे राज्यसभा निवडणुका निकालाचा उल्लेख केला नसला तरी या निकालाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अगोदरच पराभव मान्य केला असल्याचा दावा करत रालोआ ४०० जागा जिंकणार व तिस-यांदा सत्तेवर येणार, असा विश्वास व्यक्त केला. हेच भाजपचे प्रचारतंत्र आहे. हे प्रचारतंत्र वापरून भाजप विरोधी पक्षांचे व त्या पक्षातील नेत्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याची खेळी करत आहे. पक्षफुटीला दरवेळी ईडी, सीबीआयचे कारण देऊन विरोधी पक्षांना आपल्या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवता येणार नाही. त्यासाठी भाजपच्या या नीतीला चोख प्रत्युत्तर देण्याची रणनीती अवलंबावी लागेल. दुर्दैवाने विरोधी पक्षांचे प्रमुख त्यात कमी पडतायत हेच भाजपमधील वाढत्या ‘इनकमिंग’मुळे दिसून येते. असो! हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा दावा करून बहुमत चाचणीची मागणी केली आहे. विधानसभेचे अधिवेशन झाले व त्यात काँग्रेस सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना असे धक्के कायम देत त्यांच्या प्रचार मोहिमेला वेगच येऊ द्यायचा नाही, अशीच भाजपची रणनीती दिसते आहे.

विरोधी पक्षांना भाजपच्या या रणनीतीला त्वरेने उत्तर देण्याची तयारी करावी लागेल. तरच प्रत्यक्ष लढाईपूर्वीच्या या मनोवैज्ञानिक लढाईत भाजपला रोखता येईल. भाजपने राज्यसभा निवडणुकीत पुन्हा घोडेबाजार भरवून आपले तंत्र पुन्हा एकवार सिद्ध केले आहे. त्यामुळे सत्ताधा-यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसतेच आहे. विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी भाजपच्या या तंत्राला कशाप्रकारे उत्तर देणार हे आता पहावे लागेल. तूर्त राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराचा पायंडा सत्ताधारी भाजपने आता पक्का केला आहे, हे या निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तरी असे घोडेबाजार वारंवार भरलेले पाहणे, मतदारांच्या नशिबी आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR