37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवधाराशिवमध्ये नात्यागोत्यांचे राजकारण; निष्ठावंतांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या

धाराशिवमध्ये नात्यागोत्यांचे राजकारण; निष्ठावंतांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्हातील ज्येष्ठ नेते म्हणून माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांची ओळख राज्यात सर्वदूर आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा जिल्हा म्हणून ओळख होत आहे. मंत्री सावंत यांचे मुळ गाव माढा तालुक्यातील वाकाव आहे. त्यांनी व्यवसायाच्या निमित्तीने धाराशिव जिल्ह्यात बस्तान बसविले. परंडा तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क्स या नावाने खाजगी साखर कारखाना उभा केला. हा व्यवसाय करत असतानाच त्यांनी परंडा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली. ते निवडून आले आणि राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांचा समावेश झाला. सध्या ते शिवसेनेचे नेते म्हणून सर्वदूर परिचित आहेत. २०१९ मध्ये महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे मोदी लाटेत खासदार झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालिन उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा सव्वालाखाच्या फरकाने पराभव केला. मोदी लाटेत आपला निभाव लागणार नाही व अन्य कारणामुळे राणा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून २०१९ मध्ये विधानसभा लढविली. ते तुळजापूर मतदार संघाचे भाजपाचे आमदार झाले.

धाराशिव जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सत्ताकाळातही नात्यागोत्यांचे राजकारण केले जायचे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचे मेहुणे जीवनराव गोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चेअरमन त्यांचे चुलतभाऊ कै. पवनराजे निंबाळकर, त्यांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष भाचे अमोल पाटोदेकर, नगराध्यक्षा त्यांच्या बहीण पुष्पाताई पाटोदेकर, परंडा मतदार संघाचे आमदार त्यांचे मेहुणे कै. महारूद्र मोटे व भाचे राहुल मोटे, अशी महत्वाची पदे डॉ. पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांनाच दिली. पुढे आ. राणाजगजितसिंह पाटील हे राजकारणात सक्रीय झाले. त्यांनीही महत्वाची पदे पत्नी, नातेवाईकांनाच वाटली. आता धाराशिव मतदार संघाची लोकसभेची उमेदवारी महायुतीने कोणत्याही साध्या कार्यकर्त्याला दिली असती तर तो साधा कार्यकर्ता खासदार झाला असता, अशी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आहे. परंतु त्यांनी वरिष्ठ पातळीवर वजन वापरून ही जागा शिवसेनेकडे जाऊ दिली नाही. शिवसेनेकडे जागा गेली असती तर मंत्री सावंत यांनी पण त्यांच्याच घरात पुतण्या धनंजय सावंत यांना उमेदवारी दिली असती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी आपल्याच घरात घेतली.

राज्यात महाविकास आघाडी खिळखिळी झाली असल्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यात महायुतीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीचा साधाही कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, परंतु जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आपल्याच घरात व नात्यागोत्यात महत्वाची पदे ठेवायची वृत्ती कायम ठेवल्याने कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या अशी वेळ आणली आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रा. सुरेश बिराजदार, भाजपामध्ये तर अनेक नेते लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतु कोणाचीही डाळ शिजली नाही. या नाराजीतून जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापल्या पदाचे राजीनामे देऊन राग व्यक्त करताना दिसत आहेत. माजीमंत्री चव्हाण असो की, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील असो यांनीही महत्वाची पदे आपल्या घरात व नातेवाईकांना दिल्याचा इतिहास आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR