41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयमहाराष्ट्र वेटिंगवर!

महाराष्ट्र वेटिंगवर!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी मारली आहे. या यादीत १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार नसल्याने महाराष्ट्राला ‘वेटिंग’वर ठेवण्यात आल्याचे दिसते. नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा होईल, असे वाटले होते; परंतु तसे झाले नाही. यादीत ३४ मंत्री, २ माजी मुख्यमंत्री, २८ महिला आणि सर्वाधिक ५७ ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा वाराणसीमधून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुस-यांदा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून, संरक्षणमंत्री राजनाथसिंह लखनौमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

काँग्रेसचे माजी नेते-मंत्री कृपाशंकरसिंह यांनी २०२१ मध्ये भाजपात प्रवेश घेतला होता. ते उत्तर प्रदेशातील जौनपूरचे रहिवासी असून राजपूत समाजाचे आहेत. त्यांना जौनपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. म्हणजे भाजपावासी झाल्यानंतर एकप्रकारे कृपाशंकरसिंह यांना लॉटरीच लागली, असे म्हणावे लागेल. या शिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विदिशामधून तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लबकुमार देव यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ५१ जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. दुस-या क्रमांकावर मध्य प्रदेश असून या राज्यातील २४ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. पश्चिम बंगालमधील २०, राजस्थान, गुजरातमधील प्रत्येकी १५, केरळ १२ आणि तेलंगणातील ९ जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आसाम, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी ११, दिल्ली ७, जम्मू-काश्मीर २, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश २ तसेच गोवा, त्रिपुरा, अंदमान-निकोबारमधील प्रत्येकी १ तसेच दीव-दमण मधील १ जागेवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीतील २८, अनुसूचित जमातीतील १८, ओबीसीतील सर्वाधिक ५७ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. महाराष्ट्रात महायुतीचा तिढा अजून सुटलेला नाही त्यामुळे महाराष्ट्राची यादी मागे ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रातील काही उमेदवार भाजपाने जाहीर केल्यास महायुतीत बंडाळीची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील भाजपा इच्छुकांना आणखी काही काळ वाट पहावी लागण्याची चिन्हे आहेत. भाजपाच्या पहिल्या यादीत २८ महिला उमेदवार तसेच ५० पेक्षा कमी वयोगटातील युवा ४७ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ओम बिर्ला, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू, जितेंद्र सिंह, श्रीपाद नाईक, अजय भट, भुपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल आदी मंत्र्यांचा समावेश आहे. युवा यादीत केरळचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री कै. सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांचा समावेश आहे. हेमामालिनी, मनोज तिवारी, रवी किशन यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची नावे नाहीत. या यादीतून सुमारे २० टक्के विद्यमान खासदारांना वगळण्यात आले आहे शिवाय जॉन बर्ला, रामेश्वर तेली, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचीही नावे नाहीत.

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचेही नाव नाही. मालेगाव बॉम्बस्फोटामुळे चर्चेत राहिलेल्या खा. प्रज्ञा ठाकूर यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीतून विद्यमान ४० खासदारांना वगळले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पक्ष सहका-यांना, लोकसभेची किमान एक निवडणूक थेट लढवावी, अशी सूचना केली होती त्यामुळे राज्यसभा सदस्य असलेले १० खासदार या पहिल्या यादीत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी, पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम केलेले आणि अयोध्या मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नरेंद्र मिश्रा यांचे पुत्र साकेत मिश्रा, अनिल अँटोनी यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. केरळमधील मल्लपूरम मतदारसंघातून अब्दुल सलाम या मुस्लिम व्यक्तीस उमेदवारी देण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे किंवा अपेक्षित आहे अशा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार राज्यातील कोणाचाही या यादीत समावेश नाही. अलिकडेच पक्षात प्रवेश केलेल्या आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते त्या कृपाशंकरसिंह यांना तिकिट दिल्याबद्दल भाजपा वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर प्रदेशातील सर्व जागा आम्ही जिंकणार, असा निर्धार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये कृपाशंकरसिंह स्वच्छ झाले आहेत, असेच त्यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून दिसून येते. जिंकून येण्याच्या निकषास भाजपाने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी काहीही केले तरी चालते असे दिसते! भाजपाने या निवडणुकीत ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असल्याने त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू असल्याचे आणि विरोधकांपेक्षा भाजपा दोन पावले पुढे असल्याचे या निमित्ताने दिसून आले, असो. एकेकाळी कृपाशंकरसिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप होते. भाजपानेच त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून जोर लावला होता, तेच कृपाशंकर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ कसे झाले? भाजपाने त्यांना तिकिट देऊन कसला आदर्श ठेवला आहे? ना खाऊंगा, ना खाने दूंगा हे पंतप्रधानांचे धोरण होते; परंतु त्याच मोदींनी आज अनेक भ्रष्ट मंत्र्यांना स्वत:च्या पंखाखाली घेऊन अभय देत राजकारणाचा उकिरडा करून टाकला आहे. महाराष्ट्र ही राजकारणातील अचूक निदान करणारी प्रयोगशाळा असावी. म्हणून महाराष्ट्राला वेटिंग लिस्टवर नव्हे तर टेस्टिंग लिस्टवर टाकून निर्णय घेण्यात येत असावेत! इथे घराणेशाही, फंदफितुरी, युद्ध आणि माघार आदी निकष तपासता येऊ शकतात!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR