34.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरप्रत्येक मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत उमेदवार

प्रत्येक मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत उमेदवार

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. या बैठकीत जरांगे यांनी समाजाला दोन पर्याय दिले. त्यापैकी दुस-या पर्यायाला सर्वांनी सहमती दर्शवली. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा राहू शकतो. विशेष म्हणजे हा उमेदवार मराठा, धनगर, मुस्लिम, दलित या समाजाचाही असू शकतो.

१७ ते १८ मतदारंसंघांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे. मात्र, सगळे फॉर्म भरत राहिलात तर मते विखुरली जातील. त्यातून कुणाचेही साधू शकते. मुळात आपले लोकसभेत काही अडलेले नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाकावा. मुख्यमंत्री शिंदे विनाकारण मराठा समाजाच्या नजरेतून उतरायला लागले आहेत, गरज नसताना लाट अंगावर घेत आहेत. आपले काम राज्य सरकारशी असल्याने आपण विधानसभा निवडणुकीत सरकारला हिसका दाखवू. अजूनही मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतलेले नाहीत. मराठा-कुणबी एकच असताना ओबीसी आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे सरकारला विधानसभेत धडा शिकवायचा आहे, असे जरांगे म्हणाले.

३० मार्चपर्यंत गावागावांत बैठका घेऊन, डेटा आल्यावर प्रचाराला जायचे की नाही, हे ठरवू असे मनोज जरांगे यांनी सांगितले. सरकारकडून मागत बसण्यापेक्षा तुम्ही सरकारमध्ये बसा आणि सत्ताधारी-देणारे बना, असे आवाहन यावेळी जरांगेंनी समाजबांधवांना केले. मनोज जरांगे यांच्या आजच्या बैठकीनंतर मराठा समाज प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करणार, हे दिसून येत आहे. विशेष म्हणजे संभाव्य अपक्ष उमेदवार हा केवळ मराठा समाजाचा असणार नाही तर तो धनगर, दलित, मुस्लिम समाजातूनही दिला जाणार आहे. तसे झाले तर प्रस्थापित पक्षांची मोठी अडचण होऊ शकते.

समाजासमोर ठेवले २ पर्याय
जरांगे यांनी यावेळी समाजासमोर दोन पर्याय ठेवले. यामध्ये सगळ््या पक्षातील उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा बाँडवर लिहून घ्यायचा. पण लोकांना हे मान्य नव्हते. दुसरा मुद्दा प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार द्यायचा. तो उमेदवार सगळ््या जाती-धर्माचा असेल, असे म्हटले. याला लोकांनी संमती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR