34.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमंत्री धनंजय मुंडेंनी केले पंकजा मुंडेंचे स्वागत

मंत्री धनंजय मुंडेंनी केले पंकजा मुंडेंचे स्वागत

बीड : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे हे बहीण पंकजाचा प्रचार करणार का, असा प्रश्न चर्चिला जात होता. दरम्यान, आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे यांनी एकत्र गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे पंकजा यांना भावाची साथ मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

मला लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा गोपीनाथ गडावर आली आहे. माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मी सांगितले होते की, मी तुमच्या घरी येणार आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात, पालकमंत्री आहात. मला कामात मदत करा. पण मला त्यांनी सांगितले, मी गोपीनाथ गडावर येतो. आता गोपीनाथ गडावर भाऊ आला आहे. पण पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या घरी जाणार आहे. त्यानंतर त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी हा माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाली. घरात मी मोठा आहे. त्यामुळे मी स्वत: भाऊ म्हणून आलो. त्यांनी माझ्या घरी येण्यापेक्षा मी त्यांच्या भेटीसाठी येणे, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे होते, असे म्हटले. काही नेते महायुतीच्या बाहेर जाऊन उमेदवारी मागत आहेत. यावर धनंजय मुंडे यांनी त्यांची ऐपत मला माहीत आहे. त्यांना त्यांच्या मुलीला ग्रामपंचायतीत देखील निवडून आणता आले नाही, असा टोला लगावला.

पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी देत भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे बोलले जात आहे. आता महाविकास आघाडी बीडमधून कोणाला उमेदवारी देणार, याची जोरदार चर्चा सुरु आहे. बीड लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार आहे. त्यामुळे शरद पवार बीडमधून कोणाला उमेदवारी देतात, याची बीडकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

बहिणीच्या मागे भाऊ म्हणून ताकदीने उभा
बहिणीच्या मागे मोठा भाऊ म्हणून ताकदीने मी उभा आहे. ताईंच्या राजकारणातील सुरुवातीला २००९ ला मी ताईंचा प्रचार केला. या २०२४ च्या निवडणुकीत मी ताईंचा प्रचार करणार, हे मुंडे साहेबांचे आशीर्वाद आहेत. तेव्हा मुंडेसाहेब हयात होते. आज ते नसताना, माझे वडील नसताना मोठा भाऊ म्हणून मी ही जबाबदारी घेणे माझे कर्तव्य आहे. देशाला गर्व वाटावा, असा विजय पंकजा मुंडेंचा होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR