40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडामयंक यादवला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार

मयंक यादवला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार

नवी दिल्ली : लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने शनिवारी रात्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर आयपीएल २०२४ च्या सामन्यात आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले. मयंकने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वांनाच प्रभावित केले आणि लखनौला हंगामातील पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मयंकच्या गोलंदाजीने या सामन्यात लखनौचे पुनरागमन केले. या सामन्यानंतर त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला तर आयपीएल चाहत्यांमध्ये मयंकच्या वेगाने चांगलीच खळबळ उडाली आहे.

मयंकने पंजाबचे तीन गडी बाद केले. या सामन्यापूर्वी २१ वर्षीय मयंकला कोणी ओळखत नव्हते, पण त्याने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आणि भारतीय क्रिकेटमधील वेगाचा नवा बादशाह म्हणून उदयास आला. मयंक यादव दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो, त्याला लखनौ सुपरजाएंट्सने २०२२ च्या मेगा लिलावात २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे, मात्र त्या मोसमात तो लखनौकडून एकही सामना खेळू शकला नाही. गेल्या मोसमात मयंक दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होता आणि त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

लखनौचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी सांगितले की, मयंक गेल्या मोसमातील संघाच्या पहिल्या सराव सामन्यानंतर दुखापतग्रस्त झाला आणि तो कसा तरी त्याच्या दुखापतीतून बरा झाला. यानंतर त्याला कालच्या सामन्यात संधी मिळाली असता त्याने या संधीचे सोने केले आणि क्रिकेट चाहत्यांना आपल्या वेगाची जादू दाखवली.

नांद्रे बर्जरला टाकले मागे
मयंकने आयपीएल २०२४ मधील सर्वांत वेगवान चेंडू पंजाब किंग्जविरुद्ध टाकला. त्याने १२ व्या षटकाचा पहिला चेंडू ताशी १५५.८ कि.मी. वेगाने टाकला. यापूर्वी नांद्रे बर्जरने ताशी १५३ कि.मी. वेगाने चेंडू टाकला होता. आता मयंकने त्याला मागे सोडले आहे. मयंकने या सामन्यातील तिन्ही विकेट केवळ वेगामुळे मिळवल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR