देहरादून : उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील काम सुरू असलेला बोगद्याचा भाग कोसळल्याने आत ४० हून अधिक मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहेत. ७ एनडीआरएफ व एसडीआरएफ ७ यांची पथके मदत व बचावकार्यात गुंतली आहेत. अडकलेल्या कामगारांशी संपर्क झाला असून सर्व सुरक्षित असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले. बोगद्यात अडकलेल्यांना ऑक्सिजन, पाणी आणि अन्नाची पाकिटे पुरवठा पाईपद्वारे पुरवली जात आहेत.
चार धाम रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तराखंड ते यमुनोत्रीचे अंतर २६ कि.मी.ने कमी करणारा साडेचार कि.मी. अंतराचा हा बोगदा तयार करण्याचे काम सुरू होते. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या बोगद्याचा २५० मीटरचा भाग अचानक कोसळला. त्यावेळी या बोगद्यात ४० हून अधिक मजूर काम करीत होते. बोगद्याच्या तोंडाशी असलेले ढिगारे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून एसडीआरएफ आणि पोलिस यांची पथके दिवसभर जीवाचे रान करून आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याची शिकस्त करीत आहेत. तोंडापासून आतपर्यंत डोंगराचा भाग त्या स्लॅबवर कोसळला आहे. तो स्लॅब काढण्याचे कठीण काम सुरू आहे. एचआयडीसीएल कंपनीकडे या टनेल निर्मितीचे काम देण्यात आले आहे.
सर्व मजूर सुरक्षित
उत्तरकाशीचे मंडळ अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की बोगद्यात ४० लोक अडकले आहेत. सर्व सुरक्षित आहेत, आम्ही त्यांना ऑक्सिजन आणि पाणी पुरवले आहे. आम्ही बोगद्याच्या आत अडकलेल्या लोकांशी संवाद साधला. बोगद्याच्या आत सुमारे २५ मीटर पर्यंत बचावपथक पोचले आहे. सुमारे ३५ मीटर अद्याप बाकी आहे. बोगद्याच्या आत जाण्यासाठी आमचा मार्ग तयार करत आहोत.
बचावकार्यात कसूर नाही
एनडीआरएफचे अधिकारी करमवीर सिंह भंडारी यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू आहे, मात्र ढिगारा ओला असल्याने आम्हाला थोडी अडचण येत आहे, पण आमची टीम कोणतीही कसर न करता बचावकार्य करत आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यश
बचाव पथकाला स्लॅबच्या खालील एका फटीतून ऑक्सिजनचे पाईप आत ढकलण्यात यश आले. त्या मदतीने आत अडकलेल्या मजुरांना प्राणवायू मिळत राहणार आहे. दरम्यान ऑक्सिजननंतर आता पाणी आणि अन्नाची पाकिटे पुरवठा पाईपमधून पुरवण्यात आली आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगदा दुर्घटनेच्या जागेची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, बचाव कार्य आणि मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. जेवणाची पाकिटे आत पाठविण्यात आली आहेत. आम्ही तज्ज्ञांशी बोलत आहोत. तपास सुरू आहे. सर्वांची सुखरूप सुटका करणे हे आमचे प्राधान्य आहे.