32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यारोड शोवर दगडफेक, जगनमोहन रेड्डी जखमी

रोड शोवर दगडफेक, जगनमोहन रेड्डी जखमी

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली. शनिवारी रात्री हा रोड शो सुरू असताना अचानक दगडफेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिशेनेच दगड भिरकावण्यात आले. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनाही या दगडाचा मारा बसला आहे. त्यांच्या कपाळावर दगड येऊन आदळल्याने कपाळाला खोच पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र, दगडफेकीच्या घटनेमुळे आंध्रप्रदेशात एकच खळबळ उडाली.

विजयवाडाच्या सिंह नगरमध्ये जगन मोहन रेड्डी यांचा बसमधून रोड शो सुरू होता. त्यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री जखमी होताच बसमध्ये असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी पुन्हा निवडणूक प्रचार सुरू केला.

वायएसआर काँग्रेस पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर पकडला आहे. त्यांनी राज्यात ‘वुई आर रेडी’ हे कँम्पेन सुरू केलं आहे. बसमधून ही मोहीम राबवली जात आहे. त्यानिमित्ताने स्वत: जगन मोहन रेड्डीही या कॅम्पेनमध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान, आंध्रपदेशातील विधानसभेच्या १७५ आणि लोकसभेच्या २५ जागांसाठी मतदान होत आहे. येत्या १३ मे रोजी या दोन्ही निवडणुकीसाठी आंध्रप्रदेशात मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीने १५१ जागा आणि लोकसभेच्या २२ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी राज्यात टीडीपी, भाजप आणि जन सेनेची आघाडी झाली आहे. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR