Homeलातूरआज मध्यरात्री झुलणार बाळ शिवबांचा पाळणा

आज मध्यरात्री झुलणार बाळ शिवबांचा पाळणा

लातूर : प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दि. १८ फेब्रुवारी  रोजी मध्यरात्री १२ वाजता  साजरा करण्यात येणार असून महापौर जयश्री सोनकांबळे,  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर शहर महापालिका आयुक्त मानसी यांच्या हस्ते बाल शिवबांचा पाळणा झुलवून जयंती उत्सवास प्रारंभ होणार
आहे.
यावेळी पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या विशेष उपस्थितीसह महिला अधिकारी, कर्मचा-यांसह  महिला, विद्यार्थींनी  व शिवप्रेमींची उपस्थिती राहणार आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पुतळा परिसर भगव्या पताका व विद्यूत रोषणाईने सजवला जात आहे.   पुतळ्याचे कठडे व  आतील भागात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता जगद्गुुरु नरेंद्र माऊली गुरुकुलचे विद्यार्थी लेझीम सादर करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्तर दिशेस  ३० बाय २० या आकारातील भव्य मंच उभारण्यात येत असून त्यावर हा जन्मोत्सव सोहळा साजरा हाईल.
 रात्री साडे आठ वाजेपासून शिवशाहीर डॉ. निशीगंधा संतोष  साळुंके यांचा आम्ही जिजाऊंच्या लेकी  हा पोवाडे व शिव गितांचा कार्यक्रम होईल.  मंचावर   सजवलेला पाळणा राहणार असून त्यात बाल शिवबांची मूर्ती  असेल. रात्री बारा वाजले की तुता-यांचा निनाद, फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली जाईल.   यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे,  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे   यांच्या   हस्ते बाल शिवबांचा पाळणा झुलवला जाईल व पाळणे गाईले जातील. यावेळी   विविध विभाग व क्षेत्रातील  महिला अधिकारी-कर्मचारी,  विद्यार्थीनींची उपस्थिती असेल. पेढे वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR