निलंगा : प्रतिनिधी
देशातील महापुरुषांनी प्रतिकूल परिस्थितीत आठरा पगड जाती धर्मातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काँग्रेस जनसामान्याची लढाई लढत आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण करुन आमची वाटचाल सुरू आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश जनतेच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यास बळ देणारे असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, डॉ सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, आंबादास जाधव, प्रभाकर बंडकर, बालाजी गोमसाळे, लाला पटेल, चक्रधर शेळके, विठ्ठल पाटील, विलास लोभे हे उपस्थित होते.
अभय साळुंके म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने साम दाम वापरुन निवडणूक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तरीही काँग्रेस पक्षाच्या बाजूने सामान्य जनतेने लढा दिला. गत निवडणूकीत निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला केवळ १ जागा होती यंदा ५ जागांवर यश मिळाले, हलगरा, अंबुलगा, येरोळ येथील जागा थोडक्यात गमावल्या तर निलंगा पंचायत समितीमध्ये २ सदस्यांवरुन ७ जागांपर्यंत मजल मारण्यात यश मिळाले. निवडणूक आलेले सर्व सदस्य आपापल्या भागातील जनतेच्या सेवेत राहून चोख सेवा बजावतील, असे ते म्हणाले.
यावेळी निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य शाहीद पटेल, माणिकराव गायकवाड, योगिता जाधव, अवदुंबर पांचाळ, मानसी मरुरे यांचे पती प्रमोद मरुरे, पंचायत समिती सदस्य किरण पाटील, श्रीमंत जाधव, अभिजित उसनाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

