Homeलातूरशिवजयंतीदिनी देशिकेंद्रच्या विद्यार्थ्यांचा १२ तास अभ्यास

शिवजयंतीदिनी देशिकेंद्रच्या विद्यार्थ्यांचा १२ तास अभ्यास

लातूर : प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचलित येथील श्री देशिकेंद्र विद्यालयात शिवजयंती उत्साहात व अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सलग १२ तास अभ्यास करून शिवजन्मोत्सव साजरा केला व छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
हा  उपक्रम विद्यालयचे गणित शिक्षक तथा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक सदाशिव अभंगे यांनी राबविला. ८ वी वर्गाच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणा-या ५१ विद्यार्थी, विद्यार्थीनी यात सहभाग घेतला.१९ फेब्रुवारी रोजी  शिवजयंती दिनी  सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या  उपक्रमाची सांगता सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. हा उपक्रम तब्बल १२ तास चालला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस विद्यार्थ्यानींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ‘जय भवानी,जय शिवाजी’, असा जयघोष करुन सकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांनी अभ्यासास सुरुवात केली. या वेळी मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या शिष्यवृत्ती परीक्षेतील विषयांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांचे वाचन केले. कठीण भागावर गटचर्चा केली. चारही विषयांची सराव परीक्षाही घेण्यात आली.
त्यात झालेल्या चुका दुरुस्त करण्यात आल्या. विविध अध्ययन पद्धतीचा  दिवसभर अवलंब करण्यात आला.सहशिक्षक सदाशिव अभंगे यांनी सामुहिक तसेच वैयक्तिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण केले. सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.महापुरुषांचे जन्मसोहळे व पुण्यतिथी दिवस विद्यमान काळातील संदर्भ लक्षात घेऊन साजरे केले पाहिजेत.
छत्रपती शिवराय अखंड कार्यतत्पर व कर्तव्यपरायण  राजे होते. त्यामुळे विद्यार्थ्यात शिवरायांच्या कर्तव्यपरायणता व शिस्त या गुणांचे बालवयातच बिजारोपण व्हावे ही भावना उपक्रम राबविण्यामागे होती. अशा उपक्रमामुळे महापुरुषांच्या गुणांचे विद्यार्थी अनुकरण करतील व देशाचे आदर्श नागरिक बनतील, असे सदाशिव अभंगे म्हणाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कोळी तसेच रोहीणी देवणे, रत्नमाला स्वामी, सुरेश नाटकरे आदींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR