34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयआघाडीची आघाडी!

आघाडीची आघाडी!

लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात मागच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले जागावाटपाचे गु-हाळ सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीत निवडणुकीच्या दुस-या टप्प्याची रणधुमाळी प्रत्यक्षात सुरू झाली तरी कायमच होते. दोन्ही बाजू जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करत होत्या मात्र, अनेक जागांवर रस्सीखेच, वादावादी, दंड थोपटण्याचे व एकमेकांना इशारे देत शक्तिप्रदर्शन करण्याचे प्रकार सुरू होते. वाचाळवीरांच्या वक्तव्यांनी या वादावादीत तेल ओतण्याचे काम होत असल्याने आघाडीत बिघाडी होणार का? अशीच शंका व्यक्त होत होती. मात्र, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील ४८ जागांच्या वाटपाचे सूत्र एकत्रितरीत्या जाहीर करून विरोधकांच्या ऐक्याची गुढी उभारली. जागावाटपाचा घोळात घोळ महायुतीला अद्याप संपविता आला नसल्याने राज्यातल्या महाविकास आघाडीने याबाबत तरी महायुतीपेक्षा आघाडी घेतल्याचे चित्र आहे. जागावाटपात उद्धव ठाकरे यांचा गट २१, काँगे्रस १७ व शरद पवारांचा गट १० जागा लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे जागावाटपाचे सूत्र पाहता भाजपच्या विरोधातील विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेसने मन मोठे करून त्याग केल्याचे स्पष्ट होते. उद्धव ठाकरे व शरद पवार या दोघांच्याही पक्षात उभी फूट पडली.

मात्र, काँगे्रसने आपल्या पक्षात अशी उभी फूट पडू दिली नाही. त्यामुळे जागावाटपात महाविकास आघाडीत काँगे्रसच मोठा भाऊ ठरावा, हीच राज्यातील काँग्रेसजनांची स्वाभाविक इच्छा असणे साहजिकच! मात्र, उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यातील विरोधकांच्या आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. काँग्रेसच्या हायकमांडने विरोधकांच्या ऐक्यासाठी मन मोठे केले नसते तर हे शक्य नव्हतेच. मात्र, त्यागाची ही भूमिका स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये झिरपण्यास थोडा काळ लागण्याचीच चिन्हे दिसत आहेत. सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाकडेच राहिली तर मुंबईतल्या हव्या त्या चार जागा मिळविण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईची जागा ठाकरे यांच्याकडे गेल्याने काँग्रेसच्या वर्षा गायकवाड नाराज झाल्याचे व त्यांनी थेट दिल्ली दरबारी तक्रार केल्याचे वृत्त आहे. तर सांगलीत विश्वजीत कदम व विशाल पाटील काय भूमिका घेतात याची प्रतीक्षा आहे. जागावाटपानंतर काही ठिकाणी नाराजी दिसत असली तरी आम्ही संबंधित स्थानिक नेत्यांची समजूत काढू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

तशी समजूत काढली जाईलही पण जागावाटपावरून स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची ही अप्रत्यक्ष कबुलीच आहे. अर्थात तीन पक्षांमध्ये जागावाटप होताना काही जागांवर आग्रही भूमिका घेतली जाणे साहजिकच. मात्र, विरोधकांच्या व्यापक ऐक्यासाठी पक्षनेतृत्वाने मन मोठे करणे गरजेचे असते व तसे ते करून काँग्रेसने राज्यातील महाविकास आघाडीचे ऐक्य टिकवण्यात यश मिळवले, हे मान्यच करावे लागेल. इंडिया आघाडीतील पक्ष इतर राज्यांमध्ये परस्परांच्या विरोधात लढतानाचे चित्र दिसत असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ऐक्य अबाधित ठेवण्यात यश मिळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याचा धसका महायुतीने नक्कीच घेतला असेल कारण महायुतीतील तीन ते चार जागांवरचा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे व त्यावरून तीन पक्षांमधील धुसफूस रोजच बाहेर येते आहे. हे होणे साहजिक व त्यावरही तोडगा काढला जाईलच पण ऐक्याच्या प्रदर्शनात महाविकास आघाडीने आघाडी घेतली व त्यात काँग्रेसने मन मोठे करून मोलाची भूमिका बजावली, त्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करायला हवे. वाद मागे टाकून भाजपविरोधात एकीने लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला हे चांगलेच झाले. मात्र, यासोबतच राज्यात भाजपविरोधात जी सोशल इंजिनीअरिंगची संधी होती ती साधण्यात मात्र महाविकास आघाडी हुकली.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यात महाविकास आघाडीला यश आले असते तर विरोधकांच्या भाजपविरोधी ऐक्याला एक वेगळाच भरीवपणा आला असता! प्रकाश आंबेडकर यांचा आजवरचा प्रवास पाहता त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अगोदरच अंदाज आला असणारच. मात्र, अन्य पक्षांना सोबत घेण्यासाठी जी लवचिकता दाखवायला हवी ती दाखविण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे राज्यात भाजपविरोधातील विरोधकांच्या बेरजेच्या राजकारणात काही फटी राहिल्याच हे मान्य करावेच लागेल. दिंडोरीसारख्या ठिकाणी डाव्या पक्षांना एखादी जागा सोडणे किंवा राजू शेट्टी यांच्याविरोधात उमेदवार न देणे किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार न उतरवणे यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फारसा उत्साह दाखविला नाही. आंबेडकरी विचारसरणीच्या छोट्या-मोठ्या नेत्यांना सोबत घेण्यासाठी काही विशेष प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. महाविकास आघाडीने हे सोशल इंजिनीअरिंग साधले असते तर विरोधकांच्या ऐक्याला आणखी भरीवपणा आला असता हे नक्की! असो! किमान जागावाटपात आघाडी घेण्यात महाविकास आघाडीला यश आले हे ही नसे थोडके! आता महाविकास आघाडीने एकत्रित सभा, रॅलींचा धडाका लावून राज्यातील प्रचारातही आघाडी घ्यायला हवी. याबाबत आघाडीत अद्याप गती आलेली दिसत नाही.

काँग्रेसने व्यापक जाहीरनामा प्रसिद्ध करून भाजपवर आघाडी घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडीने त्यापुढे जाऊन महाराष्ट्रासाठीचा महाविकास आघाडीचा वचननामा देऊन महायुतीवर ठोस आघाडी घ्यायला हवी. आघाडीतील दोन पक्ष हे प्रादेशिक आहेत. त्यांच्या दृष्टीने असा वचननामा आवश्यक ठरणार आहे. तशी ही निवडणूक उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही पक्ष घरातल्या फुटीमुळे बेजार आहेत. ते जर्जर झालेत की, उसळून वर येतायत हे या निवडणुकीत समजणार आहे. अशावेळी किमान विरोधकांचे ऐक्य अबाधित ठेवण्यात व ते मतदारांसमोर सादर करण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी ठरले हे चांगलेच! हे ऐक्य दाखवून महाविकास आघाडीने महायुतीवर निश्चितच आघाडी घेतली आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR