34.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरअमली पदार्थांची मगरमिठी

अमली पदार्थांची मगरमिठी

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्याचे नाव सध्या अमली पदार्थांमुळे देशभरात चर्चेत आले आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात ५०४ आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी २०२३ मध्ये १३१९ गुन्ह्यांमध्ये एकूण ४३७ कोटी ९८ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले असून १७१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, एखाद्या देशाचे ५० वर्षांनंतरचे भवितव्य जाणून घ्यायचे असेल, तर त्या देशाची तरुण पिढी काय करत आहे? हे पहावे. विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहणा-या आणि जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणा-या भारतातील युवापिढी नशेच्या विळख्यात अडकत चालली असेल तर उद्या देश अंध:काराच्या खाईत जायला वेळ लागणार नाही.

रतातील अमली पदार्थांच्या वाढत्या वापराबाबत सातत्याने चिंता व्यक्त करूनही आणि सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणा, पोलिस प्रशासन या सर्वांनी सजग पहारा ठेवूनही जीवघेण्या नशेचा विळखा कमी होताना दिसत नाही. अलीकडेच पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणा-या तरुणींचा व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला. या व्हीडीओमध्ये एक मुलगी बेशुद्धावस्थेत होती, तर दुसरी मुलगी अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे नशेत बडबड करत होती. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात गांजा, कोकेन, हेरॉईन, चरस, मेफेड्रोन या अमली पदार्थ विक्रीचे हजारो किलो व कोट्यवधी रुपयांचे साठे पकडण्यात आले. पुण्यातील तस्कर ललित पाटीलचे प्रकरण असो किंवा नाशिक व छत्रपती संभाजीनगरात अमली पदार्थ तयार करणा-या कारखान्यांवरील छापे असोत या प्रकरणांमुळे अमली पदार्थांचा बाजार कसा विस्तारला आहे हे स्पष्ट झाले आहे. डीआरआयच्या पथकाने ऑक्टोबरमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात कारवाई करून तब्बल २३ किलो कोकेन, ७.४ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन आणि ९.३ किलो मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण असा साठा आणि ३० लाख रुपये रोख रक्कम जप्त केली होती. या कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे बाजारमूल्य हे २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले गेले. रायगड जिल्ह्यात पोलिसांनी गतवर्षी आठ हजार कोटींचा गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. या प्रकरणात १८ गुन्हे दाखल करून २३ जणांना अटक झाली. या जिल्ह्यातून परदेशातही अमली पदार्थांची तस्करी सुरू झाल्याची बाब समोर आली आहे. ट्रकच्या कंटेनरमध्ये वेगळा कप्पा करून छुप्या पद्धतीने गांजाची तस्करी करणा-या टोळीला पकडण्याची कामगिरी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच केली आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात ५०४ आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी २०२३ मध्ये १३१९ गुन्ह्यांमध्ये एकूण ४३७ कोटी ९८ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले असून १७१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वर्षभरातील कारवाईत साडेसात कोटींचा गांजा, ५० लाखांचे कोकेन, १० कोटींचे चरस, ४ कोटी २१ लाखांचे हेरॉईन आणि इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील वडवली खाडीकिनारी आयोजित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून डीजेच्या तालावर नशेत झिंगणा-या ९५ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व तरुण-तरुणी १८ ते २५ वयोगटातील होते. अमली पदार्थांसंदर्भातील ही सर्व कारवाई पाहता आजची तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट होत आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली तरच अमली पदार्थांचा भस्मासुर आटोक्यात येऊ शकतो. सामूहिक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने याबाबत सजगता न दाखवल्यास महाराष्ट्र नशेचे माहेरघर होण्याचा धोका आहे.
अर्थात महाराष्ट्रच नव्हे तर देशातील बहुतांश सर्व राज्यांमध्ये अमली पदार्थांचा व्यापार वेगाने वाढत आहे. २८ फेब्रुवारी २०२४ ला गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलान्े संयुक्त कारवाई केली. पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा, ३३०० किलो वजनाचे हजारो कोटींचे ड्रग्ज पकडले. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाने ही संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी ५ क्रूना अटक केली असून ते इराणी आणि पाकिस्तानी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत हजारो कोटी रुपये आहे. २५ फेब्रुवारी २०२४ ला २००० कोटी रुपयांची अमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त केली गेली. अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि देहली पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणारे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. मिश्र अन्न पावडर आणि वाळलेल्या नारळात लपवून हे अमली पदार्थ ऑस्ट्रेलिया अन् न्यूझिलंड येथे पाठवले जात होते.
राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थ मुक्त करायचे ठरवले आहे, परंतु हे यापूर्वीच केले असते तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते. गेली कित्येक वर्षे अमली पदार्थांच्या तस्करीला खतपाणी मिळत गेले असून आता डोक्यावरून पाणी गेल्यावर ते जनतेसमोर आले आहे. भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणा हे याला उत्तरदायी आहेत, हे नाकारता येणार नाही. त्यासाठी सरकारने अन्वेषण यंत्रणांना मोकळीक द्यायला हवी. अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप होऊ न देता पोलिसांनीही या प्रकरणी कडक भूमिका घेतली आणि तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली तरच अमली पदार्थांचा भस्मासुर आटोक्यात येऊ शकतो. देशोधडीला लावणारे हे अमली पदार्थ नेमके काय आहेत, त्याचे धोके कोणते, याची माहिती प्रत्येक तरुणाला असलीच पाहिजे. पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकातर्फे वर्षभर जनजागृती सुरू असते. शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जागृती केली जाते. पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून ती ड्रग्जच्या आहारी जाणार नाहीत. अमली पदार्थांच्या तस्करीला वेगवेगळे कंगोरे आहेत. आता जेवढी माहिती पोलिस तपासातून पुढे येत आहे, ती फक्त हिमनगाचा पाण्याच्या वरचा भाग आहे. याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या विभागांनी एकत्रित तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशातील तरुण पिढी व्यसनाधीन करणे, हा दीर्घकालीन राष्ट्रविघातक नियोजनाचा एक भाग आहे.

सायबर गुन्हे आणि ड्रग्ज टेररीझम या बाबी वेगवेगळ्या नाहीत. नार्कोटिक्स, सायबर गुन्हे यातून मिळणारे पैसे देशाच्या विरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा धोका आहे. त्यामुळे एकत्रित तपास यंत्रणा उभारण्याची ही वेळ आहे. यासाठी तपास यंत्रणांमधील अधिका-यांनी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजेत. या प्रत्येक घटकांनी केवळ पाठीला पाठ लावून नाही, तर खांद्याला खांदा लावून समन्वयाने एक विचाराने तपास करणे आवश्यक आहे. पाकिस्तानकडून भारतामध्ये शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी तो ड्रोन्सचाही अधिकाधिक वापर करत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्याच्या ड्रोन्सना नष्ट करण्यासाठी भारताने स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा पुढील सहा महिन्यांत कार्यान्वित केली जाऊ शकते. अमली पदार्थांचा दहशतवाद थांबवायचा असेल तर बहुआयामी अभियानाची गरज आहे.

पुणे येथे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील ३ दिवसांत पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले; जे पुणे विद्येचे, संस्कृतीचे माहेरघर समजले जाते, त्याच पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येत असतील आणि तरुण पिढी अशा नशेला फसत असेल, तर हा शहराच्या आणि राज्याच्या दृष्टीने किती मोठा धोका आहे, हे लक्षात येते. ज्या पुण्यात राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणाच्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याच पुण्यात अशा अनैतिक, नीतिहीन घटना घडत असताना पुणेकर किंवा अन्य संघटना यांवर विशेष काही बोलतही नाहीत, हे दुर्दैवी आणि आश्चर्यकारक आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, एखाद्या देशाचे ५० वर्षांनंतरचे भवितव्य जाणून घ्यायचे असेल, तर त्या देशाची तरुण पिढी काय करत आहे? हे पहावे. यानुसार आता विचार केला, तर तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकत चालली असेल तर उद्या देश अंध:काराच्या खाईत जायला वेळ लागणार नाही.

आज भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहात असताना अशा प्रकारे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नशेखोर झाली तर तरुण पिढीचे भवितव्य नसणारा भोगवादी देश म्हणून भारताची ओळख होईल, अशी भीती आहे. शाळेपासून महाविद्यालयांपर्यंत होणारे अमली पदार्थांचे सेवन तसेच विविध अमली पदार्थांची पुण्यासारख्या महानगरात सहज होणारी उपलब्धता ही चिंतेची गोष्ट आहे. अमली पदार्थांच्या या लाटेत तरुण पिढी वाहून जात आहे. तरुण पिढीला शारीरिक, मानसिकदृष्ट्या अधू बनवणा-या अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात गुन्हे वाढतात. अमली पदार्थांच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होतो. कोट्यवधी रुपयांचा चोरटा बाजार असलेला अमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो. या तस्करीचा पैसा जगभरात आतंकवादासाठी वापरला जात आहे. त्यामुळे जागतिक समुदायानेही याबाबत सामूहिक लढा देण्याचा विचार करणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR