41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयआक्रस्ताळी नेतान्याहू!

आक्रस्ताळी नेतान्याहू!

संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या युद्धबंदी ठरावाला केराची टोपली दाखवून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांना चढलेल्या उद्दामी युद्धज्वराचा पुरावा तर दिलाच आहे! वर या ठरावाला अमेरिकेने नकाराधिकार वापरून रोखले नाही म्हणून आक्रस्ताळेपणाही सुरू केला आहे! आजवर अमेरिकेच्या पाठिंब्यावरच आपले अस्तित्व कायम ठेवणा-या इस्रायलने अमेरिकेने पाठिंबा नाही दिला तरी हमासचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय हल्ले थांबविणार नसल्याची घोषणा केली. शिवाय संतापलेल्या नेतान्याहू यांनी इस्रायली उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा अमेरिकी दौराही तडकाफडकी रद्द करून टाकला. नेतान्याहू यांचा हा आक्रस्ताळी युद्धज्वर पाहता हे युद्धही रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणेच दीर्घकाळ सुरूच राहण्याच्या वाटेवर जात असल्याचीच चिन्हे आहेत. अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाने केलेला ठराव हा इस्रायलसाठी बंधनकारक नसल्याने तो फुसका बार आहे. या ठरावाला केराची टोपली दाखवून इस्रायलने ते दाखवून दिले आहे. मात्र, अमेरिकेने आपली भूमिका बदलून इस्रायलच्या युद्धखोरीला पाठिंब्यास नकार दर्शविल्याने नेतान्याहू अस्वस्थ झाले आहेत. यापूर्वी अनेकदा अमेरिकेने आपला नकाराधिकार वापरून इस्रायलला उघड पाठिंबा दिला आहे.

मात्र, यावेळी अमेरिकेने आपली भूमिका बदलून आपल्या अनुपस्थितीद्वारे या ठरावाला अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन एकप्रकारे इस्रायलला जोरदार धक्काच दिला आहे. रमजानच्या काळात इस्रायलने युद्धबंदी करावी व हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करावी, असे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या ठरावात नमूद केले होते. मात्र, इस्रायलने हा ठराव आक्रस्ताळेपणा करत फेटाळून लावला आहे. ऑक्टोबरमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यात बाराशे जणांचा बळी गेला आणि जवळपास २५० जणांना हमासने ताब्यात घेऊन ओलीस ठेवले होते. हमासची ही कृती नि:संशय निंदनीयच होती! मात्र, हमासला उत्तर म्हणून इस्रायलने गाझापट्टीवर सुरू केलेल्या हल्ल्यात आजवर जवळपास ३२ हजार पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. त्यात बहुतांश लहान मुले व महिलांचा समावेश आहे. ७५ हजारांवर नागरिक जखमी झाले आहेत. तर २० लाख नागरिक निर्वासित झाले आहेत. रमजानच्या काळात रक्तपात सुरू राहिला तर शेजारी अरब राष्ट्रांमध्ये युद्धज्वर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, रक्तपात थांबविण्यास इस्रायल व हमास दोघेही तयार नाहीत.

हमासचा पूर्ण नि:पात आणि ओलिसांची सुटका होईपर्यंत युद्धबंदी नाही, अशी ताठर भूमिका नेतान्याहू यांनी घेतली आहे. उलट यापुढच्या काळात राफाहच्या दक्षिण भागात हल्ले चढविण्याची इस्रायलची योजना असल्याचे संकेत नेतान्याहू यांनी दिले आहेत. इस्रायलने हल्ले सुरू केल्यावर हजारो पॅलेस्टिनी निर्वासितांनी राफाहच्या दक्षिण भागात आश्रय घेतला आहे. इस्रायलने जर हे आक्रस्ताळी पाऊल उचलले तर प्रचंड मोठा रक्तपात घडू शकतो. अमेरिकेसह जगाला याची चिंता आहे. त्यामुळेच अमेरिकेसह जगातील अनेक देशांची इस्रायलबाबतची आजवरची भूमिका बदलते आहे. ‘हमासने इस्रायलवर केलेला हल्ला निर्घृणच होता; परंतु आता इस्रायल आपल्या भूमिकेमुळे जागतिक पाठिंबा गमावत आहे’, हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान अमेरिकेसह जगाच्या इस्रायलबाबत बदलत असलेल्या दृष्टिकोनाचे द्योतक ठरावे. अर्थात अमेरिकेच्या इस्रायलबाबत बदलत्या भूमिकेस अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांचीही पार्श्वभूमी आहेच! अमेरिकी जनतेला इस्रायलच्या हटवादी भूमिकेला अमेरिकेने पाठीशी घालणे फारसे रुचलेले नाही.

आता नेतान्याहू यांनी अमेरिकेबाबतच आक्रस्ताळी भूमिका घेतल्याने अमेरिका-इस्रायल संबंध कितपत ताणले जाणार ही नवी चिंता निर्माण झाली आहे. युद्धबंदीसाठी अमेरिका इस्रायलवर थेट दबाव आणण्यासाठी इस्रायलला सुरू असलेली मदत थांबविण्याचा निर्णय घेणार की, मदत सुरू ठेवून दुस-या मार्गाने नेतान्याहू यांचा युद्धज्वर उतरवणार, हे आता पहावे लागेल. खरं तर हमासच्या प्रतिनिधीने थेट हाच प्रश्न उपस्थित करून अमेरिकेच्या इस्रायलबाबतच्या दुटप्पी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. मात्र, नेतान्याहू यांना हे समजून घेण्याची इच्छा असल्याचे दिसत नाही. अमेरिकेने आपले सगळे लाड पुरवावेत आणि आपल्याला मर्जीप्रमाणे हवे तसे वागू द्यावे, अशीच नेतान्याहू यांची इच्छा दिसते. अमेरिकेलाही आता बेभान झालेल्या या नेतान्याहू यांना आवरणे दिवसेंदिवस कठीणच होत चालले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेने आजवर ८३ वेळा नकाराधिकार वापरला आहे.

त्यातील ४३ वेळा हा नकाराधिकार अमेरिकेने इस्रायलचा निषेध रोखण्यासाठी केला आहे. हमासला धडा शिकवण्याच्या नावाखाली हजारो निष्पापांचा बळी इस्रायलने घेतला आहे. हा रक्तपात थांबविण्याच्या आवाहनास इस्रायल दाद देत नसल्यानेच संयुक्त राष्ट्रसंघाला युद्धबंदीचा ठराव करावा लागला. मात्र, त्या ठरावालाही भीक घालण्यास आक्रस्ताळी नेतान्याहू तयार नाहीत. उलट आजवर ज्या अमेरिकेने त्यांना पोसले त्या अमेरिकेलाच ते डोळे वटारून दरडावण्याचा प्रयत्न करतायत! नेतान्याहू यांचा आक्रस्ताळी भूमिका घेण्यामागे देशांतर्गत आपली खुर्ची बळकट करण्याचा डाव दिसतो आहे. नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यातून वाचण्यासाठी त्यांनी घटनाच बदलण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशांतर्गत वातावरण प्रचंड तापले होते. अशावेळी हमासच्या हल्ल्याचा वापर करून राष्ट्रवादाच्या भावनेआड विरोधकांची तोंडे बंद करण्याची चाल नेतान्याहू खेळताना दिसत आहेत. त्यातूनच त्यांनी आक्रमकतेचा मुखवटा धारण केला आहे व ते आपल्या पोशिंद्या अमेरिकेवरही डोळे वटारत आहेत.

अमेरिकेने आजवर इस्रायलचे सगळे लाड विनातक्रार पुरवले आहेत कारण त्यामागे अमेरिकेचा या भागावर आपले वर्चस्व राखण्याचा स्वार्थ होता. मात्र, आता अमेरिकी जनतेतूनच इस्रायलचे हे लाड पुरविण्यास विरोध होतो आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणातून अमेरिकी जनतेने पॅलेस्टिनींवरील हल्ले रोखण्याची मागणी केल्याने बायडेन यांच्यावर जनमताचा दबाव वाढला आहे. त्यामुळे जर अमेरिकेने उद्या इस्रायलचा पाठिंबा काढून घेतला तर मात्र इस्रायलच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. इस्रायलचे शेजारी या देशाचे नामोनिशाणही मिटवून टाकतील. मात्र, स्वार्थाने बेभान नेतान्याहू यांना याचे भान आहे असे अजिबात जाणवत नाही. त्यांनी आपला आक्रस्ताळेपणा सोडला नाही तर हे युद्ध या भागात पसरण्याची व मोठा भडका उडण्याची शक्यता आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR