40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeराष्ट्रीयइलेक्टोरल बॉंड जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना

इलेक्टोरल बॉंड जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लखनौ : वृत्तसंस्था
इलेक्टोरल बाँड योजना ही जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हल्लाबोल केला.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या बाजूने जोरदार अंडरकरंट आहे. यावेळी भाजप फक्त १५० जागांपर्यंतच मजल मारू शकेल. उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून गाझीपूरपर्यंत परिवर्तनाचे वारे वाहू लागतील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला भव्य निरोप दिला जाईल, असे अखिलेश यादव यावेळी म्हणाले.

रद्द करण्यात आलेल्या इलेक्टोरल बाँडवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांचा दावा आहे की, ही योजना निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणली गेली होती, मग सर्वोच्च न्यायालयाने ती का रद्द केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इलेक्टोरल बाँड योजना ही जगातील सर्वात मोठी खंडणी योजना आहे. भारतातील उद्योगपतींना हे चांगलेच माहीत आहे. पंतप्रधानांनी कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण पंतप्रधान हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे, असे गांधी म्हणाले. यावेळी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. मोदी सरकारने शेतकरी, सर्वसामान्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत गेला आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे, असा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झालेली आहे. राज्यात काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढत आहे तर सपा आणि इतर काही सहयोगी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशातील उर्वरित ६३ जागांवर लढत आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. उत्तर प्रदेशातील ८० जागांवर देशाच्या राजकारणाचे गणित ठरते. उत्तर प्रदेशात जो सर्वाधिक जागा जिंकतो, त्याच्याच हाती देशाच्या सत्तेची सूत्रे असतात. यावेळीही राज्यात भाजपला अनुकूल वातावरण असले, तरी ब-याच मतदारसंघात भाजपसमोर आव्हान उभे केलेले आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. त्यातच कॉंग्रेस आणि सपासह मित्रपक्षांचे नेते एकजुटीने भाजपविरोधात उभे आहेत, याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

देणगी देणा-यांची
नावे का लपविली?
जर तुम्हाला पारदर्शकता आणायची होती, तर भाजपला हजारो कोटी रुपयांची देणगी देणा-यांची नावे का लपवली गेली, ज्या कंपन्यांनी भाजपला देणग्या दिल्या त्याच्या तारखा का लपवल्या गेल्या, असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला.

दबावापोटी देणगी
एका कंपनीला हजारो कोटींचे कंत्राट मिळाल्याचे आढळून आले आणि काही दिवसांनी त्या कंपनीने भाजपला देणगी दिली. एका फर्मची सीबीआय किंवा ईडी चौकशी झाली आणि १०-१५ दिवसांनी त्या फर्मने भाजपला देणगी दिली आणि ती चौकशी संपली, अशा घटना समोर आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR