लातूर : प्रतिनिधी
उन्हाच्या झळांनी मराठवाडा तापला असतानाच लातूर जिल्हा होरपळून निघत आहे. अगदी सूर्योदय होताच उन्हाची तीव्रता सूरू होते. दुपारी तर सूर्य आग ओकत असल्यामुळे उन्हाच्या झळा अस होत आहेत. दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्यामुळे बाजारपेठा ओस पडत आहेत. उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.
लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे. संपूर्ण दिवसभर उष्ण व कोरडे हवामान असते. नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. गेल्या चार दिवसांपासून दुपारी १२ ते ४ यावेळेत उन्हाच्या झळा अस होत आहेत. त्यामुळे अत्यवश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठेवरही स्पष्टपणे जाणवत आहे. नागरिकांची बाजारपेठेतील वर्दळ लक्षणीय घटली आहे. दुपारच्या वेळी गंजगोलाईसह शहरातील बाजारपेठा ओस पडत आहेत.
लातूर जिल्ह्याच्या तापमानात आता मोठी वाढ होणार असून दि. १८ एप्रिल म्हणजेच वैशाख मासारंभापासून उष्णतेच्या तीव्र लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञाने व्यक्त केला आहे. वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक विविध उपाययोजना करीत आहेत. चौकाचौकातील शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. घरातून बाहेर पडताना डोके झाकूनच बाहेर पडत आहेत. गॉगल, टोपी, गमछा, स्कार्प, छत्रीचा वापर वाढला आहे. दुपारी १२ ते ४ यावेळेत काही कामानिमित्त लातूर शहरात आलेले बाहेरील नागरिक शहरातील बाग-बगिचांमध्ये झाडाच्या सावलीत आराम करताना दिसत आहेत. दुपारच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात गर्दी होत आहेत. तर सायंकाळच्या विलासराव देशमुख पार्क, जिल्हा क्रीडा संकुलामध्येही नागरिकांची गर्दी होत आहे.

