34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरगोरगरिबांची काळजी करणा-या काँग्रेसला निवडून आणू

गोरगरिबांची काळजी करणा-या काँग्रेसला निवडून आणू

रेणापूर : प्रतिनिधी
विकायला गेलेल्या मालाला बाजारात भाव नाही आणि खरेदी करण्यासाठी म्हणून घ्यायला गेलेला माल स्वस्त नाही त्यामुळे महिला, शेतकरी, तरुण, व्यापारी सगळेच त्रासले आहेत. अशा अडचणीच्या, महागाईच्या काळातून आपली सुटका करून घेण्यासाठी गोरगरिबांची काळजी करणा-या काँग्रेस पक्षाला म्हणजेच इंडिया आघाडीला आपण निवडून आणू, असे आवाहन विलास कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी शनिवार, दि. १३ एप्रिल रोजी येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेणापूर येथे रेणापूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याला श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी संबोधित केले. या वेळी लातूर ग्रामीणचे आमदार  धिरज विलासराव देशमुख, काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, महिला काँग्रेसच्या लातूर शहराध्यक्ष स्मिता खानापुरे, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शिलाताई पाटील, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सुनिता आरळीकर, सपना किसवे, अनिता केंद्रे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे आदी उपस्थित होते.
श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख म्हणाल्या, आपले नेतृत्व शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख या सर्वांनी आपली काळजी घेतली. आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अमित देशमुख, धिरज देशमुख हे आपली काळजी घेत आहेत. काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. येत्या निवडणुकीत आपण काँग्रेसला बळ द्यावे. आपल्याला डॉ. शिवाजी काळगे यांना या निवडणुकीत निवडून आणायचे आहे. त्यांचा प्रचार सर्वांनी असाच उत्स्फूर्तपणे करावा.
आपण गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारचे काम पाहिले आहे. या काळात महिलांना मोठा त्रास झाला. नोटाबंदी केली. विविध घटकांतील महिलांना कितीतरी आश्वासने दिली; पण ती सरकारने पूर्णच केली नाहीत. महागाई वाढवली. शेतीमालाला भाव दिला नाही. दुधाला भाव नाही. सोन्याचे भाव हाताबाहेर गेल्याने गरिबांच्या घरातील लग्नाचा खर्च वाढला आहे. अशा एका अडचणीच्या काळात आपण येऊन उभे आहोत त्यामुळे आता विचार करून आपल्याला सरकार निवडायचे आहे. अशा वेळी काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असे श्रीमती  वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सांगितले.
काँग्रेसमुळे देशाच्या विकासात  महिलांचाही मोठा वाटा
आमदार धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्षाने कायमच महिलांना सन्मान देण्याचे, अधिकार देण्याचे, पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्याचे काम केले आहे. प्रत्येक कार्यात महिलांना अग्रस्थान देण्याचे काम केले त्यामुळेच देशाच्या विकासात महिलांचाही मोठा वाटा आहे. म्हणूनच येणा-या ७ मे रोजी महिला, भगिनींनी मोठ्या संख्येने काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मतदान करावे.
केंद्र सरकारने महागाई भरमसाठ वाढवून ठेवली. नोटाबंदी केली. नोक-या दिल्या नाहीत. सुरक्षित वातावरण ठेवले नाही. अशा अनेक निर्णयातून महिलांना त्रास देण्याचे काम या सरकारने केले आहे. सरकारने माय माऊलींचा, नारीशक्तीचा आवाज कधीच ऐकला नाही, असे सांगून आमदार धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेसने देश घडवला, भक्कमपणे उभा केला. लोकांना अधिकार दिले. स्वातंत्र्य  दिले, लोकशाही जपली. लोकांचा विकास हाच काँग्रेसचा विचार आहे. विकासाची जाहिरात करून विकास होत नाही. भाजप सरकारचा विकास हा चिप्सच्या पाकिटमधील हवेसारखा पोकळ आहे. गोरगरीब लोकांची पिळवणूक करणा-या केंद्र सरकारला आता हद्दपार करणे गरजेचे आहे.
महिलांनी आपले आशीर्वाद आम्हाला द्यावेत
डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, आपले नेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना न्याय, हक्क व सुरक्षा मिळवून देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांच्या हितासाठी आपण काँग्रेसला पाठिंबा द्यावा. केंद्र सरकारला आता जनता वैतागली आहे त्यामुळे सर्वांना आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करून देणारी ही निवडणूक आहे म्हणून महिलांनी आपले आशीर्वाद आमच्या पाठीवर असू द्यावेत. या प्रसंगी लालासाहेब चव्हाण, लातूर ग्रामीण मतदारसंघाचे लोकसभा निरीक्षक अनुप शेळके, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष स्वाती सोमाणी, सविता काळगे, रेणापूर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजा इगे, रेणापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निर्मला गायकवाड आदींसह रेणापूर तालुक्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश नवगिरे यांनी, सूत्रसंचालन संचिता खोत यांनी केले तर आभार पूजा इगे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR