36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयजागावाटपाचा गुंता

जागावाटपाचा गुंता

लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. त्यामुळे सारेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र निवडणुकीच्या हालचालींना जसा वेग येत आहे, तसा जागावाटपाचा गुंता वाढत चालला आहे. युती-आघाडीतले वाद चव्हाट्यावर येत आहेत. ‘ठरले’ शब्द दुस-याच क्षणी ‘विरले’ होत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचे सूत्र गुरुवारी ठरल्याचे सांगण्यात येत असून त्यानुसार ठाकरे गट २० जागा, काँग्रेस १८ तर शरद पवार गट १० जागा लढविण्याची शक्यता आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या २ जागा दिल्या जाऊ शकतात. परंतु वंचित बहुजन आघाडी हा प्रस्ताव मान्य करणार का हा खरा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला अपेक्षेप्रमाणे २२ जागा मिळाल्या तर ठाकरे गट २ जागा मित्रपक्षाला सोडण्यास तयार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मित्रपक्ष म्हणजे स्वाभिमानीसाठी १ जागा आणि वंचितसाठी १ जागा सोडण्यास ठाकरे गट तयार आहे म्हणे.

जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्यापक चर्चा झाली. मात्र, काँग्रेस व शिवसेना अजूनही काही जागांवर आग्रही असल्याचे समजते. जागावाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत कुठलेच मतभेद नाहीत, असे आधीच सांगण्यात आले आहे. आणखी एका सूत्रानुसार महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गट ४८ पैकी २३ जागांवर लढणार आहे. त्यापैकी २ जागा ठाकरे गट मित्रपक्षांना देणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला १५ ते १७ तर शरद पवार गटाला ९ ते ११ जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गट मुंबईत ४ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढवण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तर अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकेल. कोल्हापूरच्या जागेबाबत पेच आहे. ही जागा सध्या ठाकरे गटाकडे आहे. पण काँग्रेसला ही जागा हवी आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी ही जागा काँगे्रसला हवी आहे.

कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात ठाकरे गटाने काँगे्रसकडे सांगलीची जागा मागितली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलडाणा, हिंगोली आणि यवतमाळ या जागांवर ठाकरे गट निवडणूक लढण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसमोर काही प्रस्ताव ठेवले आहेत. त्यावरून असे दिसते की बाळासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका भूमिकेवर ठाम नाहीत. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा घटक होणार की स्वतंत्र लढणार याबाबतही अजून कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही. वंचित आघाडीला किती जागा द्यायच्या यावर खल सुरू आहे. त्यामुळे वंचित आघाडीला किती जागा मिळणार आणि ते त्यांना मंजूर होणार का, यावर वंचितची भूमिका ठरू शकते. राज्यातील ४८ पैकी २७ मतदारसंघात वंचितचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी दिल्लीत झाली. या बैठकीत देशभरातील १८० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर विचार करण्यात आला. या नावांची घोषणा दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

देशात जे विद्यमान खासदार आहेत, त्यातील ब-याच जणांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता आहे. महायुतीतही जागावाटपाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. कारण महायुतीतील मित्रपक्षांच्या अनेक जागांवर भाजपचे नेते दावा ठोकत आहेत. आधीच रायगडावरून वाद सुरू झाला होता. त्यासोबतच कोल्हापूर, हातकणंगले, शिरूर, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीतही भाजपने मोर्चेबांधणी केली असून या जागांवर भाजपचे नेते दावा करू लागले आहेत. दरम्यान, जिथे शिवसेनेच्या जागा, तेथे आमचा दावा असे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या १८ जागा शिवसेनेकडे आहेत. मात्र, शिवसेनेत फूट पडल्याने १३ खासदार शिंदे गटासोबत आहेत तर ५ खासदार उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. यापैकी ब-याच जागांवर भाजपचे स्थानिक नेते दावा करीत आहेत. भाजपच्या नेत्यांचीही शिवसेनेच्या ब-याच जागांवर नजर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपात खूप कसरत करावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना भाजपने दिलेल्या प्रस्तावावर विचार करावा लागेल आणि तडजोड करताना आपल्याच विद्यमान खासदारांची नाराजीही ओढवून घ्यावी लागेल. त्यामुळे जागावाटपाच्या वेळी चांगलीच कोंडी होण्याची चिन्हे आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपचा डोळा आहे.

काही जागांवरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. यात रामटेक, कोल्हापूर, हातकणंगलेसह शिरूर, मावळ मतदारसंघावरही दावा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीच्या जागेवरही भाजपने दावा केला आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे यांना मैदानात उतरविण्याचा शिंदे गटाचा विचार आहे. हिंगोलीत शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत. याही जागेवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे एक तर यातील काही जागा भाजपला सोडाव्या लागतील अथवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घोडेही फुरफुरत आहे. त्यामुळे अंतिम जागावाटपाच्या वेळी बरीच रणधुमाळी माजण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. असो. जागावाटपाच्या निमित्ताने प्रमुख पक्षांना ‘गुंतुनी गुंत्यात सा-या, पाय माझा मोकळा’ असे म्हणता येईल काय?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR