38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडजि. प.चा २२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

जि. प.चा २२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

नांदेड : प्रतिनिधी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सन २०२४-२५ चा २२.३६ कोटींची तरतुद असलेला प्रशासकीय कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सभागृहात सादर करून त्यास मान्यता दिली. सोबतच सन २०२३-२४ च्या सुधारित अर्थसंकल्पासही मान्यता देण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक नाविन्यपुर्ण योजनांसाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे, असे करणवाल यांनी यावेळी सांगीतले.

नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून घेण्यात येणा-या योजनेचे सन २०२३-२४ चे सुधारित व सन २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबतची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवार दि. ५ मार्च रोजी दुपारी १ वा. झाली. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुक्कावार, मंजुषा कापसे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या अर्थसंकल्पानूसार सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण होणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या स्वच्छता, सुरक्षा आणि पार्किंग सोयी करता ८० लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेची इमारत स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद इमारतीमधील कार्यालय सुस्थितीत आणण्यासाठी व सुशोभिकरणासाठी ७० लक्ष अशा रितीने अन्य बाबी मिळून एकूण बांधकाम विभागासाठी रु.४ कोटी ६ लक्ष ७५ हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे.

शासन निर्णय ग्राम विकास विभाग दि.११ फेब्रुवारी २०२० (परिशिष्ट १) नुसार जिल्हा परिषदेच्या एकूण महसुली उत्पन्नाच्या ५ टक्के हिस्सा प्राथमिक शिक्षणासाठी राखीव ठेवणे बाबत आदेश आहेत. त्यानुसार शिक्षण विभत्तगास आगामी वर्षामध्ये १ कोटी १२ लाख ६ हजार रुपये तरतूद ठेवण्यात आली आहे. या तरतुदीमधून शिक्षण विभागाच्या नियमित योजना व्यतिरिक्त नवीन योजना अंतर्भूत केल्या आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेमध्ये पोषण आहार शिजविण्याकरिता ओटा नाही अशा ठिकाणी किचन ओटे बांधण्याकरिता २७ लक्षाची तरतुद असून १३० ओटे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगीतले.

तर आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमाद्वारे शिक्षण देण्याकरिता आणि विद्यार्थ्यांची शिक्षणातील रुची वाढवण्याहेतू १५ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. शालेय पुस्तकासोबत इतर पूरक ग्रंथ वाचनाची आवड निर्माण करणे हेतू १० लक्ष तर मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक आणि समाजचिंतक कै.नरहर कुरुंदकर स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट सािित्यकांना पुरस्कार देण्यासाठी ५ लक्ष रुपये व स्त्री क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराकरिता ५ लक्ष तरतूद ठेवण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबा देवस्थानाच्या वार्षिक यात्रासाठी व जिल्ह्यातील अन्य यात्रेसाठी रु.६५ लक्ष तरतूद असून यात्रेसह ग्रामीण भागातील कच-यावर प्रक्रिया करणारा प्लँट उभारण्यासाठी ५० लक्षाची तरतुद करण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण अंतर्गत साथीच्या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी १० लाख रुपये निधीची तरतूद तर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर बायो मेडिकल वेस्टमधून होणा-या प्रदूषणाचा अटकाव करण्यासाठी ६२ लाख ४० हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात होणा-या श्वानदंशावर उपचारासाठी तसेच साप चावून होणारे मृत्यू रोखण्यासाठी एआरव्ही आणि एएसव्हीएस इंजेक्शन पुरवण्यासाठी २० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या नियमित औषधी खरेदी व वरील योजनांसह एकूण रु.१ कोटी ५७ लाख ९० हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी ४ कोटी ४७ लक्ष रूपये, अनुसुचित जाती जमाती आणि दुर्बल घटकाच्या योजनांसाठी १ कोटी ५६ लक्ष, दिव्यांगाच्या योजना व पुनर्वसनासाठी १ कोटी ११ लक्ष तर महिला व बालकल्याण विभागासाठी ९६ लक्ष रूपये तरतुद आहे.

तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब व शेतीधारक शहीद जवानांच्या कुटुंबासाठी १० लक्ष, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण यासह पंचायतराज कार्यक्रमासाठी २ कोटी ६५ लक्ष रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यासाठी ७५ लक्ष यासह अन्य योजनांसाठी तरतुद करण्यात आली आहे. एकुण २२ कोटी ३६ लक्ष ७७ हजार महसुली जमेच्या अनुषंगाने २२ कोटी ३१ लक्ष ६० हजार २०० रूपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून सदर अर्थसंकल्प ५ लक्ष १६ हजार ८०० रूपये शिलकेचा आहे, यास प्रशासक या नात्याने सादर करून मान्यता देत असल्याचे मीनल करणवाल यांनी यावेळी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR