33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरनवीन शिक्षकांच्या नेमणुका निवडणूकीमूळे लांबणीवर

नवीन शिक्षकांच्या नेमणुका निवडणूकीमूळे लांबणीवर

सोलापूर :
नवीन शिक्षक भरती झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला २७३ शिक्षक मिळाले. सुरवातीला त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी युद्धपातळीवर करण्यात आली. पण, समांतर आरक्षणातील नवनियुक्त शिक्षकांच्या आरक्षणाची पडताळणी, पोलिसांकडील चारित्र्य पडताळणीचा दाखला, फिटनेस प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची अद्याप पडताळणी बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांचे समुपदेशन होईल आणि त्यानंतर त्यांना संबंधित शाळांवर पदस्थापना दिली जाणार आहे. लोकसभा आचारसंहितेमुळे या नवीन शिक्षकांना पदस्थापनेसाठी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

राज्यातील दोन हजार ३१९ शिक्षक आंतरजिल्हा बदलीस पात्र ठरले, पण, आता लोकसभा निवडणुकीमुळे त्यांची कार्यमुक्ती रखडली आहे. सुरवातीला नवीन शिक्षक भरतीमुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. या शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात येण्यासाठी निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत आहे तेथेच थांबावे लागणार आहे.

शिक्षक भरती झाल्यापासून स्वतःच्या कुटुंबापासून (आई-वडील) दूर परजिल्ह्यात नोकरी करणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून ठरावीक वर्षांनतर स्वजिल्ह्यात येण्याची संधी मिळाली. ऑनलाइन पद्धतीने ग्रामविकास विभागातर्फे ही बदली प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी पार पडली. मात्र, नवीन शिक्षक भरती सुरू झाल्याने त्यांची कार्यमुक्ती रखडली. शिक्षक भरतीनंतर लगेचच कार्यमुक्तीचे आदेश निघतील, अशी त्यांना आशा होती. परंतु, आता लोकसभा निवडणुकीमुळे पुन्हा त्यांना थांबावेच लागणार आहे. आता नव्याने भरती झालेल्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत एकाच जिल्ह्यात काम करावे लागणार असून त्यांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. शेवटच्या आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल, या आशेवरील शिक्षकांना कधीपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्हा परिषदेला ८२ शिक्षक मिळणार आहेत. पण, कार्यमुक्तीचे आदेश नसल्याने ते अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे तत्पूर्वी नव्याने भरती झालेल्यांची समुपदेशनाद्वारे पदस्थापना होईल. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांना पुन्हा ज्या शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी नेमणुका मिळतील अशी सद्यः स्थिती आहे. त्यामुळे स्वजिल्ह्यात येऊनही त्यांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळेल की नाही, याबाबत शंका कायम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR