39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरशहरात आता चार ऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठा

शहरात आता चार ऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या काळात शहरावर पाणी संकट ओढवले आहे. उजनी धरण, औज बंधारा, हिप्परगा तलावातील अत्यल्प पाणीसाठा आहे. हे पाणी जूनपर्यंत वापरण्यासाठी शहरात आता चार ऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी काटकसरीने पाणीवापर करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले.

चौबे म्हणाले, उजनी धरणात वजा ३६ टक्के पाणीसाठा आहे. धरणातून दुबार पंपिंग करून पाणीउपसा सुरू आहे. हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी अत्यल्प आहे. औज बंधारा नुकताच भरला आहे. या बंधाऱ्यातील पाणी पुढील दीड महिना टिकवणे आवश्यक आहे. या कारणास्तव शहरातील मेडिकल पंपगृह, जुळे सोलापुरातील पाणी टाकी, नेहरूनगर टाकी परिसर, सोरेगाव पाइपलाइन येथून होणारा पाणीपुरवठा चारऐवजी पाच दिवसांआड होईल.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी ते सोलापूर मुख्य पाइपलाइनवर सोरेगाव येथे देगाव शाखा कालवा व हत्तूर नाला जोडणीचे काम १ व २ एप्रिल रोजी होणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी टाकळी पंपहाउस बंद राहील.
जुळे सोलापूर, नेहरूनगर, मजरेवाडी या भागात सोमवार, १ एप्रिलनंतर ५ दिवसांनंतर पाणी येईल.

महापालिकेला मार्च महिन्यात दुबार पंपिंग करण्याची वेळ आली. २० वर्षांपूर्वी मार्च महिन्यात दुबार पंपिंग करावे लागले होते.उजनी कालवा सल्लागार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुन्हा दुबार पंपिंगची वेळ आली आहे.उजनी धरण यंदा केवळ ६० टक्के भरले. धरणातील पाण्याचा सप्टेंबरपासून काटकसरीने वापर करणे आवश्यक होते. परंतु, धरणाच्या कालव्यातून बेसुमार पाणी सोडले.

उजनी धरणावर पालिकेचे पंपगृह आहे. या पंपगृहातील चार पंप नियमित सुरू असतात. दुबार पंपिंगमुळे चालणारे 1 पंप नियमित नाहीत. पाकणी पंपगृह नियमित भरणार नाही. याचा मोठा फटका शहराला बसणार आहे.
शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्यात येत आहे. हे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी केले होते. परंतु, टेंभुर्णी येथे हे काम अडविण्यात आले. आता हे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मुबलक पाणी असूनही शहरावर पाणी संकट ओढवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR