29.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeनांदेडनांदेडमध्ये मॅचफिक्सिंग; मतदार विरुद्ध मोदी लढाई

नांदेडमध्ये मॅचफिक्सिंग; मतदार विरुद्ध मोदी लढाई

नांदेड: चारुदत्त चौधरी
नांदेडचा काँग्रेसचा उमेदवार म्हणजे मॅचफिक्सिंग झालेला उमेदवार आहे की नाही, असा सवाल थेट जनतेला अ‍ॅड.आंबेडकरांनी केल्यानंतर प्रेक्षकांमधून मोठा प्रतिसाद मिळाला. यावरून असेच म्हणावे लागेल की, काँग्रेसचा उमेदवार हा मॅचफिक्सिंगचा आहे. ही लोकशाहीची लढाई मतदार विरूद्ध मोदी असल्याचाही टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केली.

नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.अविनाश भोसीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडला आले असता नव्या मोंढ्यात पार पडलेल्या सभेत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर बोलत होते. व्यासपीठावर फारूक अहेमद, शिवा नरंगले, श्याम कांबळे, विठ्ठल गायकवाड, अमृत नरंगले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, २०१४ नंतर सत्तेत आल्यानंतर मोदींनी हळूहळू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मोदींना ज्या संघामुळे पंतप्रधानपद मिळाले त्या संघाचा आज त्यांना विसर पडला आहे. जे मोदी संघाचे होऊ शकले नाहीत ते आमचे -तुमचे कसे होतील, असेही अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले.

भागवत आणि मोदींमध्ये बेबनाव झाला आहे हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते. तेव्हा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवाहन करतो की, तुमचे आमचे भांडण वंशपरंपरागत आहे. थोड्या वेळाकरीता हे भांडण बाजूला ठेवून मोदींचा हिशोब करण्यासाठी आपण एकत्र येऊ, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना अ‍ॅड.आंबेडकर यांनी केले. मोदी म्हणजे नौटंकी आहे. दरवर्षी आपल्या आईला ते भेटायला जायचे. विमानतळापासून ते घरापर्यंत फोटो काढायचे आणि सोशल मिडियावर टाकायचे. अशी चीप पब्लिसिटी ते नेहमीच करतात. मोदी आपल्या घराच्या बाहेरच्या दालनात बसून आईसोबत बोलायचे. त्यांच्या हाताने काही खायचे. त्याचेदेखील फोटो काढायचे. परंतु घरातील एकाही कुटुंबातील कधीही जवळ करून फोटो काढल्याचे चित्र प्रसिद्ध झाले नाही. असे हे मोदी म्हणजे नौटंकीबाज आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकूण ५२ खोल्या आहेत. एक खोली ४०० चौ. फूटाची आहे. त्यापैकी एका खोलीमध्ये त्यांनी आईला का ठेवले नाही. जेणेकरून आईचे दर्शन रोज घेता येईल. पण असे त्यांना करायचे नव्हते. कारण आपण केलेले काळे कृत्य आईला कळू नये म्हणून मोदींनी आपल्या आईला दिल्लीच्या घरात न ठेवता गुजरातमध्येच ठेवले.

मोदी हा मृत्यूचा सौदागर आहे, असे फलक काँग्रेस पक्षाने २०१२ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये लावले होते. परंतु भितीपोटी ते बोर्ड शेवटी त्यांनी काढले. आजच्या परिस्थितीत काँग्रेसचे ते बोर्ड खरेच होते. कारण अन्न व औषधी प्रशासनाने भारतातील शेकडो औषधांवर कायमची बंदी आणली होती. ज्यामुळे त्या औषधी कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. अशा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयाचे निवडणूक बाँड खरेदी केले आणि त्या औषधांना पुन्हा परवानगी मिळाली. या परिस्थितीत नरेंद्र मोदी हे मृत्यूचे सौदागर आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नांदेडमध्ये मॅचफिक्सिंग झाली आहे.

वंचितचा उमेदवार हा सर्वसामान्यांमधील उमेदवार आहे. चळवळीमधील हा कार्यकर्ता असून त्याचे हात बळकट करा, असेही ते म्हणाले. माझा शब्द म्हणजे गॅरंटी आहे, असे मोदी नेहमीच सांगतात. पण आपण यांच्या शपथा घेतो. कारण मेले तरी ते मरतील. मोदींच्या गॅरंटीमध्ये ते सांगतात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आले तरी सुद्धा ते संविधान बदलू शकत नाहीत. १९५६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे ते परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोदींनी हे सांगावे की, मी संविधान बदलणार नाही. असाच एक उल्लेख माजी रक्षामंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकरन् यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत केला. त्याचा उल्लेख करताना आंबेडकर म्हणाले, यंदाची निवडणूक ही मोदींसाठी शेवटची निवडणूक आहे. कारण यानंतर देशाचा नकाशा असा काही बदलेल की तो आपल्या देशाचा नकाशा आहे की, नाही हे ओळखता येणार नाही, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात अ‍ॅड.अविनाश भोसीकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या अनेक नेत्यांनी व्यासपीठावरून आपली मते व्यक्त केली. दुपारी दीड वाजता सुरू झालेली सभा दीड तास सुरूच होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय नव्या मोंढ्यात जमा झाला होता. दुपारच्या कडकडीत उन्हात नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. सिडको येथील मैदानात हेलिकॉप्टरने अ‍ॅड.आंबेडकर यांचे आगमन झाले आणि त्यानंतर ते सभास्थळी रवाना झाले. यावेळी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR