41.2 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रप्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करणार

प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करणार

पंकजा यांच्या बीडमधील वक्तव्याने खळबळ

बीड : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये महायुतीकडून अद्याप जागा व उमेदवार निश्चिती होत नसताना बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवार म्हणून उभे करणार असल्याची घोषणा केल्याने महायुतीच्या इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला आहे. परंतु दुसरीकडे महायुतीकडून अद्याप कुठल्या पक्षाला जागा सोडावी याबाबत निश्चिती नाही. भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातून नाशिकच्या जागेवर दावा केला जात आहे. ठाण्याच्या बदल्यात नाशिक यावर भाजप व शिंदे सेनेत बोलणी सुरू आहे.

असे असताना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करणार असल्याची घोषणा केली. पंकजा यांची घोषणा तत्कालीन परिस्थितीमध्ये राजकीय असली तरी नाशिकमध्ये मात्र त्याचे परिणाम दिसून आले.

शिंदे सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटामध्ये नाशिकच्या जागेमध्ये स्पर्धा सुरू असताना पंकजा यांनी परस्पर प्रीतम यांची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीमध्ये नेमके काय चालले आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

घरचं झालं थोडं…!
नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. असे असताना पंकजा मुंडे यांनी परस्पर प्रीतम मुंडे यांची घोषणा केल्याने ‘घरचं झालं थोडं…’ अशी तिखट प्रतिक्रिया महायुतीतील घटक पक्षांमधील इच्छुकांकडून व्यक्त केली गेली. पंकजा यांच्या घोषणेमुळे नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीमधील तिढा कमी होण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसत आहे.

पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे : भुजबळ

आज अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांना, पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देण्याविषयी वक्तव्य केले, त्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR