36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeधाराशिवयेरमाळा सर्कलच्या मंडळ अधिका-याला लाच घेताना अटक

येरमाळा सर्कलच्या मंडळ अधिका-याला लाच घेताना अटक

धाराशिव : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी देवानंद मरगू कांबळे यांना तक्रारदाराकडून ४ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दि. २८ मार्च रोजी दुपारी करण्यात आली. या प्रकरणी लाचखोर मंडळ अधिका-याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळ येथे देवानंद मरगू कांबळे ( वय ४२) हे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी चोराखळी येथील देवस्थानच्या जमिनीतून रॉयल्टी न भरता मुरूमाची वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराकडे दि. २७ मार्च रोजी चार हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तसेच संबंधित तलाठी यांना कारवाई न करणेबाबत सांगतो म्हणाले होते. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी पथकाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून सापळा रचण्यात आला होता. मंडळ अधिकारी श्री. कांबळे यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष चार हजार रुपये लाचेची मागणी करून दि. २८ रोजी लाच स्वत: स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक विकास राठोड यांनी पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, मार्गदर्शक पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. सापळा पथकामध्ये पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके यांचा समावेश होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR