29.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeधाराशिव१ मंत्री, ७ आमदार, अनेकांचे प्रवेश असताना मोदींची सभा कशासाठी?

१ मंत्री, ७ आमदार, अनेकांचे प्रवेश असताना मोदींची सभा कशासाठी?

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीकडे तानाजी सावंत यांच्या माध्यमातून १ मंत्री तसेच विविध ७ आमदारांची फौज आहे. असे असताना महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाराशिव येथे सभेसाठी येत आहेत त्यामुळे या मतदारसंघात सध्या महायुतीच्या विजयाबाबत सत्ताधा-यांमध्ये आत्मविश्वास नाही की काय? असा संभ्रम असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात चर्चिली जात आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर तर महायुतीकडून अर्चना पाटील यांच्यात तगडी फाईट होताना दिसून येत आहे. यामध्ये दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही उमेदवारांकडून अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यात एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या मतदारसंघातील भूम-परंडा-वाशी विधानसभेचे आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह माजी मंत्री तथा आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. ज्ञानराज चौगुले, आ. राजाभाऊ राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. सुरेश धस असे ७ आमदार आहेत तसेच माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह तीनही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी यांची भली मोठी फौज आहे. ही फौज प्रचारात सक्रीय झाली असून प्रत्येक ठिकाणी बैठका, सभा असा प्रचार सुरू आहे.

या उलट सत्ताधारी खासदार यांच्याकडे आ. कैलास पाटील हे केवळ एकमेव आमदार असून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे असले तरी त्यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्यामुळे त्यांच्या बाबतही संभ्रम आहे. याशिवाय माजी आमदार राहुल मोटे, दिलीप सोपल, ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने हे प्रचारात आहे. महाविकास आघाडीकडे केवळ १ आमदार सोडला तर बाकी सर्व माजी आमदार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून सहाजिकच वरिष्ठ नेत्यांच्या सभा घेणे क्रमप्राप्त आहे.

त्यानुसार आजपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अमित देशमुख, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सभा झाल्या आहेत शिवाय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख यांच्या आणखी सभा होणार आहेत तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव लोकसभा मतदारसंघातील १ मंत्री व ७ आमदारांची फौज असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंढे, पंकजा मुंढे, बाबा सिद्दिकी आदींच्या सभा होणार असून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (दि. ३०) धाराशिव येथे सभा घेणार आहेत. यामुळे महायुतीचा एवढा फौजफाटा असताना पंतप्रधानांची सभा घेणे म्हणजे महायुतीच्या नेत्यांना विजयाबाबत संभ्रम आहे की काय, अशी चर्चा सध्या या मतदारसंघात जोरदार रंगू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR