32.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरराजमाता जिजाऊंची प्रेरणा घेऊन निलंग्यातील मातांनी डॉ. काळगेंना विजयी करावे

राजमाता जिजाऊंची प्रेरणा घेऊन निलंग्यातील मातांनी डॉ. काळगेंना विजयी करावे

निलंगा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निलंगा तालुक्याला संधी मिळाली असून जसे राजमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तसे निलंगा तालुक्यातील सर्व माता, माऊलींनी आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना जिजाऊ मासाहेबांची प्रेरणा घेऊन विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ दि. १८ एप्रिल रोजी निलंगा येथील केतकी मंगल कार्यालयात महाविकास आघाडी महिला मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला त्या वेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. या वेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळुंके, अजित माने, लिंबन महाराज रेशमे, आबासाहेब पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रा. स्मिता खानापुरे, सुनीता आरळीकर, निरीक्षक संतोष देशमुख, शोभाताई बेंजरगे, संगीताताई पाटील निलंगेकर, महादेवी पाटील, रेखाताई पुजारी, कुशावर्ता बेळ्ळे, मुन्नाबी मोमीन, सरोजाताई गायकवाड, पूजा सगर, संगीताताई मोळवणे, प्रभावती साळुंखे, जयश्रीताई उटगे, सुनीता चोपणे यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षाच्या निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महिला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,  एवढ्या  मोठ्या संख्येने राजकीय महिला मेळाव्यास महिला भगिनी जमण्याची ही पहिलीच वेळ असून याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. शेतीमालाला हमीभाव देण्याची हमी काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी, सोनिया गांधी यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिली आहे. म्हणून आपल्याला आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडी उमेदवारांना विजयी करावे. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर लोकसभेतून २ वेळा भाजपाचा खासदार निवडून दिला; पण त्यांनी १० वर्षात आपल्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
कोविड १९ काळात सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी काँग्रेस महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे राहिले आणि आज मत मागणा-या विरोधकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. आपल्या लातूरला लोकनेते विलासराव देशमुखसाहेब, श्रद्धेय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या आदर्श राजकारणाची परंपरा असून ही कायम ठेवून आपल्याकरिता विविध राज्य तसेच केंद्राच्या योजना खेचून आणण्यासाठी कटिबद्ध असून आपण आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि निलंग्याला जिल्ह्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळाली असून त्याचे आपण या निवडणुकीत सोने करावे व डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवावे, असे आवाहन सर्व महिला भगिनींना त्यांनी केले.
या वेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या भावी पिढीसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली असून गेल्या १० वर्षांतील कोपराला गूळ लावणा-या  सरकारने आपल्या अपेक्षांचा भंग केला. अनेक आश्वासने भाजपा सरकारने आपल्याला दिली; पण एकही आश्वासन पूर्ण केले नाही. या सरकारकडे सांगण्यासारखे ठोस मुद्दे नसल्याने आता जाती, धर्माचे राजकारण हे सरकार करीत आहे.  यामुळेच आपले गेल्या १० वर्षातील झालेले आपले नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी आणि लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे लागेल. आपण जर या वेळी चुकलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणून डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले. या वेळी बोलताना संगीताताई पाटील निलंगेकर यांनी महिलांचे विविध प्रश्न, बचत गटांच्या महिलांना येणा-या अडचणी या बाबतीत बोलताना विद्यमान भाजपा सरकार बदलून इंडिया आघाडी सरकार सत्तेत आणावे लागेल, असे म्हणत यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन उपस्थित सर्व महिला भगिनींना केले.
या वेळी बोलताना शिवसेना नेत्या शोभाताई बेंजरगे, अस्मिता साळुंके, शिलाताई पाटील यांनी महिला भगिनींना डॉ.  शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.   दरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी महाराष्ट्र महाविद्यालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन  केले तसेच अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR