33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुलांची टुडी इको चाचणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुलांची टुडी इको चाचणी

सोलापूर : जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत महिला व नवजात शिशू रुग्णालयात महानगरपालिका, वडाळा, मंदूप, मोहोळ, अक्कलकोट या तालुक्यांतील ० ते १८ वयोगटातील संशयित हृदयरोग ८५ मुलांसाठी मोफत टू डी ईको तपासणी शिबिर घेण्यात आले. यातील २३ मुलांना हृदययरोग शस्त्रक्रियेची गरज असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. दरम्यान, यांच्यावर विविध शासकीय योजनेअंतर्गत मोफत इलाज केले जाणार आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. यात प्रामुख्याने जन्मतः व्यंग, पोषणद्रव्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासात्मक बदल, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांवर उपचार व निदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविले जातात.

या अंतर्गत संशयित हृदयरोगी मुलांची जवळपास दोन हजार रुपयांची टु डी इको तपासणी मोफत केली जाते. शिवाय दरम्यान, गुरुवारी झालेल्या शिबिरात संशयित ८५ जणांची तपासणी करण्यात आली. यातील २३ जणांना ऑपरेशनसाठी रेफर करण्यात आले आहे; तर २० बालकांची वेळोवेळी तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सकसुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशू व महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, डॉ. मुकुंद माने, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता वी, प्रतीक मिश्रा, डॉ. रोहन वायचळ, आदींच्या उपस्थितीत झाले. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण ४७५९ अंगणवाड्यातील मुलांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी केली जाते; तर एकूण ४११६ शाळांतील मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. सोलापूर जिल्ह्यात एकूण ५२ आरोग्य तपासणी पथके कार्यरत आहेत. यासाठी डॉ. पल्लवी अंभोरे, उमेश वीरकर, आदींनी परीश्रम घेतले.

हे शिबिर गरीब व कष्टकरी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून आजतागायत जिल्ह्यातील ६००० मुलांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया कार्यक्रमातून झालेले आहेत. ज्या मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पथकांशी संपर्क साधावा.असे नवजात शिशु व महिला रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR