शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरुर अनंतपाळ तालुक्यात गत अनेक वर्षांपासून ज्वारी पिकाकडे पाठ फिरविणा-या शेतक-यांनी यंदा जवळपास चारशे हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली आहे.परतीचा पाऊस व मुबलक पाण्यामुळे या शेत शिवारात रब्बी ज्वारी सध्या बहरली असून यावर्षी तालुक्यात रब्बी ज्वारीचे चांगले उत्पादन निघेल या अपेक्षेने शेतक-यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
सोयाबीननंतर रिकामे झालेल्या जमीनीवर शेतक-यांनी सर्वाधिक हरभरा पिकाचा पेरा केला आहे तर त्या खालोखाल रब्बी ज्वारीचा पेरा केला आहे. पोषक वातावरणामुळे सध्या ज्वारी बहरली आहे तर रब्बी ज्वारीचा पेरा वाढल्यामुळे उत्पन्न वाढ होऊन तालुक्यातील पशुधनाच्या चा-याचा प्रश्नही ्र मिटणार आहे. दरम्यान तालुक्यातील जमीनी या सुपीक कसदार व मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तसेच पशुधनाला चारा मिळावा यासाठी रब्बी हंगामात रब्बी ज्वारी पेरण्याकडे बहुसंख्यांक शेतक-यांचा कल असतो. वर्षभर घरात खाण्यासाठी व यातून आर्थिक मदत या पिकांतून शेतक-यांना होते. त्यामुळे तालुक्याता ज्वारीचे लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. त्यासोबत यावर्षी परतीच्या पावसाने या भागात मोठा पाऊस पडल्याने ज्वारीच्या पिकास जीवदान मिळून ज्वारी चांगली बहरली आहे. त्यात ज्वारीच्या वाढीकरीता आवश्यक वातावरण असल्याने यावर्षी ज्वारीचे विक्रमी उत्पादन होईल अशी आशा भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात ज्वारी तर मजुरांना काम उपलब्ध होऊन चांगला रोजगार मिळणार आहे.

