अहमदाबाद : सलग ४ पराभवांच्या धक्क्यानंतर सहाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळविला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ३० व्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने गुजरात टायटन्सचा ९९ धावांनी मोठा पराभव केला. या विजयासह मुंबईने स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तिलकच्या शतकाच्या जोरावर मुंबईने २० षटकांत १९९ धावांचा डोंगर उभा केला. जसप्रीत बुमराह आणि अश्वनी कुमारच्या धारदार स्पेलसमोर गुजरातचा एक पण फलंदाज तग धरू शकला नाही आणि गुजरातचा संपूर्ण संघ अवघ्या १०० धावांवर गारद झाला.
या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यानंतर तिलक वर्माने जोरदार फटकेबाजी करीत धावसंख्या वाढविली. त्यामुळे गुजरातसमोर मोठे आव्हान उभे करण्यात यश आले.

