36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीय विशेषएआय टीचर : क्रांती की संकट?

एआय टीचर : क्रांती की संकट?

अलीकडेच भारताला पहिली एआय शिक्षिका मिळाली. ही बाब भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी असून तंत्रज्ञानाच्या पातळीवर हे देशाचे अभूतपूर्व यशही मानावे लागेल. केरळच्या तिरुअनंतपूरम येथील एका खासगी शाळेत सादर केलेली आयरिस नामक ही रोबो शिक्षिका चॅटजीपीटीसारख्या एआय तंत्रज्ञानयुक्त असून तिच्याकडे गणित, विज्ञान यासारख्या विषयांच्या प्रश्नांना काही मिनिटांतच उत्तर देण्याची क्षमता आहे. तीन भाषेत बोलू शकणारी एआय शिक्षिका विद्यार्थ्यांशी संवाद साधते आणि हस्तांदोलन करते. विशेष म्हणजे या मशिनरूपी शिक्षकाला कोणताही पगार नको, त्याला फक्त बसविलेली बॅटरी चार्ज करण्याची गरज आहे. मशिनरूपी शिक्षक हा विद्यार्थ्यांना एकच विषय अनेकदा शिकवू शकतो आणि तोही कोणत्याही कंटाळाविना. मग यामुळे शिक्षकांच्या रोजगारावर टाच येईल का? शिक्षकांची भूमिकाच संपुष्टात येईल का?

र्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा आज जागतिक पटलावरील चर्चांचा केंद्रबिंदू ठरू पाहात आहे. एआयच्या क्षेत्रात प्रगत राष्ट्रांप्रमाणेच भारतही प्रयत्नशीलपणाने आघाडी घेत आहे. अलीकडेच भारताला एआय शिक्षिका मिळाली. ही बाब भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी आहेच, त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या पातळीवर देशाचे हे अभूतपूर्व यशही मानावे लागेल. केरळच्या तिरुअनंतपूरम येथील एका खासगी शाळेत सादर केलेल्या रोबो शिक्षिकेचे नाव आयरिस आहे. ही शिक्षिका चॅटजीपीटीसारख्या एआय तंत्रज्ञानयुक्त असून तिच्याकडे गणित, विज्ञान यासारख्या विषयांच्या प्रश्नांना काही मिनिटांतच उत्तर देण्याची क्षमता आहे.

तीन भाषांत बोलू शकणारी एआय शिक्षिका साडीचा पेहराव करते. तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि हस्तांदोलनही केले. शिक्षण क्षेत्रात एआय वापराचे हे एक अनोखे उदाहरण मानावे लागेल. वास्तविक कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात १९५० मध्ये झाली, परंतु त्याचा विकास होण्यासाठी दोन दशकं वाट पाहावी लागली. १९७० च्या दशकात एआयच्या विस्तारास प्रारंभ झाला. अलीकडचे उदाहरण सांगायचे झाल्यास नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटी नावाचे ओपन एआय चॅटबॉट अस्तित्वात आल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल झाला. चॅटजीपीटीतील उच्च पातळीचे अल्गोरिदम आणि प्रोग्रॅमिंग याचा वापर केला जातो आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि मानवी कार्यात सुलभता आणण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी चॅटजीपीटीला विकसित केलेल्या बुद्धीचा वापर करावा लागतो. याच चॅटजीपीटीला रोबोशी जोडून केरळच्या शाळेत कृत्रिम शिक्षकाच्या रूपातून आणण्यात आले. पण यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितपत योग्य? किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासाचा वारू असाच वेगाने उधळू लागला तर भविष्यातील त्याचे स्वरूप कसे असेल?

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट, ब्रिटनच्या एका शाळेने एआय चॅटबॉटला प्रिन्सिपल हेड टीचर केले आणि विद्यार्थांना देखील एआय आधारित पर्सनल असिस्टंट देण्यात आला. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश किती मर्यादेपर्यंत करायला हवा? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर फार डोकं खाजवण्याची गरज नाही. आपल्या बुद्धिमत्तेचे घोडे पळवून एक तार्किक विचार करण्याची आवश्यकता आहे. विचार करा, एखाद्या विद्यालयास किंवा महाविद्यालयाला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त रोबो शिक्षकांच्या भरवशावर सोडता येऊ शकते का? किंवा असे पाऊल उचलत विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंतामुक्त होता येईल का? या प्रश्नांवर आपण मंथन केले तर त्याचे उत्तर नकारात्मकच राहील.

कारण ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित रोबो शिक्षक हा एक उच्च कोटीचे अल्गोरिदम आणि उच्च प्रतीची माहितीची क्षमता राखणारे मशिन आहे. विविध प्रश्नांची उत्तरे कदाचित रोबो शिक्षक देऊ शकेल, परंतु खरा कस वैचारिक आणि सर्जनशीलतेच्या पातळीवर लागेल. त्यावेळी रोबो यंत्रणेतील उणिवा समोर येतील. याचे कारण अगदी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. एआय आधारित मशिन ही प्रत्यक्षातील शिक्षकाचे स्थान कधीही घेऊ शकत नाही. कारण अभ्यासक्रमातील विषयावर विचार करणे, ते समजून घेणे आणि त्यातील तार्किकता मांडण्याची क्षमता सध्याच्या रोबोकडे नाही. कोणत्याही विषयाला चांगल्या रीतीने समजून सांगण्यासाठी देखील वैचारिक शक्तीचा आणि क्षमतेचा वापर करण्याची नितांत गरज असते. त्याचप्रमाणे मातीचा गोळा असणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनशक्तीनुसार, वयोगटानुसार, प्रांतानुसार, लोकसंस्कृतीनुसार अभ्यासक्रमातील विषय संवेदनशीलपणाने मांडण्यासाठीची मानवी भावनाशीलता रोबो टीचरकडे नसते. असे असले तरी रोबो टीचरमुळे शिक्षकी पेशावर काहीच फरक पडणार नाही, असे म्हणता येणार नाही. एका आकडेवारीनुसार, एआय २०३० पर्यंत ३० कोटी नोकरींवर गंडांतर येऊ शकते.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात मांडलेले मत देखील हेच सांगते की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक तंत्रज्ञानातील क्रांती आहे आणि ती उत्पादन क्षमता, जागतिक उत्पन्न आणि विकासाला चालना देईल, परंतु हीच तंत्रज्ञान क्रांती बेरोजगारी निर्माण करू शकते आणि असमानतेची दरी अधिक व्यापक करू शकते. शेवटी या सर्व अहवालाचे निष्कर्ष काय? भविष्यकाळात शिक्षकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागेल का? एका निर्जिव मशिनमुळे बेरोजगारी वाढेल का? इथे एकच गोष्ट दिसते ती म्हणजे मशिनरूपी शिक्षकाला कोणताही पगार नको, त्याला फक्त आणि फक्त बसविलेली बॅटरी चार्ज करण्याची गरज आहे. अर्थात शिक्षक म्हटलं तर पगार आला. त्यामुळे शाळेचा बजेटचा बराचसा भाग शिक्षकांच्या वेतनावर खर्च होतो. दुसरे म्हणजे मानवी शिक्षकांकडून वेळोवेळी मागण्या केल्या जातात आणि त्या पूर्ण न झाल्यास देशभरात आंदोलनही उभारले जाते. अशावेळी रोबोकडून विशेष कोणतीच मागणी राहणार नाही आणि आंदोलन करण्याचा तर प्रश्नच नाही. तरीही मानव आणि मशिन यांच्यातील आणखी काही फरकांचा विचार केला तर मशिनरूपी शिक्षक हा विद्यार्थ्यांना एकच विषय अनेकदा शिकवू शकतो आणि तोही कोणताही कंटाळा न करता! याउलट मानवी शिक्षकाला एकच मुद्दा किंवा धडा पुन्हा पुन्हा शिकवताना मानसिक तणावाला सामोरे जावे लागण्याची वेळ येऊ शकते.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे एआय आधारित मशिन शिक्षक हा वास्तविक बुद्धीवर आधारित मानवी शिक्षकाच्या तुलनेत उत्तम सिद्ध होतो. पण मानवतेचे स्थान मशिन कधीही घेऊ शकत नाही. यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो की, एआयला शिक्षण क्षेत्रात कितपत मर्यादेपर्यंत हस्तक्षेप करण्याची परवानगी द्यायला हवी?तंत्रज्ञान हे दुधारी तलवार मानले जाते. त्याच्या नेहमीच दोन्ही बाजू दिसल्या आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक. शिक्षण क्षेत्रात देखील आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सकारात्मक बाजूंचा विचार करायला हवा. शिक्षकांच्या जागी मशिन नेमणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे, मात्र शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने एआय साहाय्यक उपलब्ध करून दिल्यास ते संयुक्तिक राहू शकते. हे देखील आव्हानात्मक आहे. कारण विद्यार्थ्यांना एआयसारख्या सुविधांची मोकळीक दिली तर मुले किरकोळ समस्या सोडविण्यासाठी देखील एआयकडे धाव घेत राहतील. परिणामी स्वत: एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणे किंवा एखादे रचनात्मक पद्धतीने कार्य पुढे नेण्यासंदर्भात त्यांच्या अंगी असणारी प्रतिभा ही हळूहळू कमी होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले आणि वाईट याची ओळख पटविण्याबरोबरच सकारात्मक आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी तंत्र योजना आखली पाहिजे. शिक्षकांना कृत्रिम बद्धिमत्तेचा आधार केवळ ज्ञान वृद्धिंगत आणि विषयांची सखोल माहिती घेण्यापुरताच असायला हवा. याशिवाय नवनवीन कल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून शिक्षकांनी स्वत:ला मशिनपेक्षा आपण किती सर्वोत्तम आहोत, हे सिद्ध करणे गरजेचे आहे.

-महेश कोळी, संगणक अभियंता

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR