41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयसमाजमाध्यमावरील गोंधळ!

समाजमाध्यमावरील गोंधळ!

मोबाईलने लोकांना किती वेडे केले आहे याचा प्रत्यय मंगळवार, दि. ५ मार्च रोजी रात्री आला. दिवसभराचा आणि रात्रीचाही जास्तीत जास्त वेळ समाजमाध्यमावर व्यस्त असणा-या नेटक-यांना मंगळवारची रात्र ‘वै-या’ची वाटू लागली. त्यांना अन्न गोड वाटेना, पाणीही प्यावेसे वाटेना. कारण फेसबुक, इन्स्टाग्राम अचानक मृत झाले. आधीच उन्हाळा सुरू झाल्याने अंगाची काहिली होत असताना दैवतरूपी समाजमाध्यमे बंद झाल्याने अंगाची लाही लाही झाली. अगदीच चैन पडेना तेव्हा एकमेकांना फोना-फोनी करून तुमचे फेसबुक सुरू आहे काय? अशी विचारणा सुरू झाली. दोन्ही सोशल मीडिया अचानक ठप्प झाल्याने यूजर्सची खाती आपोआप लॉग आऊट झाली.

प्रारंभी ही समस्या आपल्याच मोबाईलवर झाल्याचे प्रत्येकाला वाटत होते, कारण व्हॉटस्अ‍ॅप सुरळीत सुरू होते. बिघाड ‘मेटा’च्या सर्व्हरमध्ये झाल्याने फेसबुक व इन्स्टाग्रामच्या सेवा बंद पडल्या होत्या. या गोंधळामुळे आपण मोबाईलचे किती गुलाम बनलो आहोत ते मात्र सिद्ध झाले. जगभरात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ‘मेटा’ची सेवा बंद पडली. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्रामसह मेटाचे सर्व अ‍ॅप्लिकेशन्स आणि सोशल मीडिया साईट्स बंद पडल्या. फोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरील फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाली. त्यानंतर यूजर्सनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला पण अ‍ॅप्लिकेशन्स सुरू होण्याचे नाव घेत नव्हते. लॉग इन केले की एरर येत होते. कोड टाका, पासवर्ड टाका अशा सूचना येत होत्या. लॉग इन होत नसल्याबद्दल फेसबुक अथवा इन्स्टाग्रामकडून कोणतीच माहिती देण्यात येत नव्हती. काही ठिकाणी तासाभरात सेवा पूर्ववत झाल्याचे सांगण्यात येते.

दोन्ही माध्यमे हॅक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती तर काही जणांना आपला डेटा चोरीला जाण्याची भीती सतावत होती. केंद्र सरकारनेच देशात मेटाच्या सेवा बंद केल्या की काय अशी शंका काही यूजर्सनी व्यक्त केली. मंगळवारी रात्री जो गोंधळ उडाला त्यामागे डॉस हल्ला असण्याची शक्यता काही सायबरतज्ज्ञांनी व्यक्त केली. डॉस अ‍ॅटॅकमुळेच फेसबुक डाऊन झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. अचानक दोन्ही समाजमाध्यमे बंद झाल्याने संपूर्ण जगभरात गोंधळ उडाला. ‘मेटा’चे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद झाल्यामुळे यूजर्स चिंतेत पडले. रिफ्रेश करूनही पुन्हा लॉग इन करता येत नसल्यामुळे लोक एक्सवर आले आणि त्यांनी चिंता व्यक्त केली. संपूर्ण फेसबुक डाऊन का झाले याबाबत कोणतीही अपडेट देण्यात आली नाही. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर ‘सेशन एक्सपायर्ड’ असे मेसेज आले. त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉग आऊट झाले आहेत. तुमचा लॉग इन कालबा झाला आहे असा एरर मेसेज दिसल्यानंतर यूजर्सनी पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. परंतु क्रेडेन्शियल्स नाकारण्यात आली. असे का झाले याबाबतचे अधिकृत उत्तर मिळाले नाही. फेसबुक डाऊन झाल्यानंतर ट्वीटरवर मीम्सचा पूर आला.

लोकांनी अनेक मजेशीर ट्वीट केल्या. मार्क झुकेरबर्ग यांनी शांत रहा, काही क्षण थांबा, सारे काही ठीक होईल, समस्या सोडवल्या जातील असे म्हटले. अनेक लोक एकाच वेळी सर्व्हरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्म डाऊन झाले. काही सायबरतज्ज्ञांच्या मते बहुतांश यूजर्स हे बनावट आहेत. फेसबुकला आऊटेजचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वापरकर्ते लॉग आऊट झाले आहेत. आऊटेजमुळे तुमचा पासवर्ड स्वीकारला जात नाही, तुमचा पासवर्ड चुकीचा आहे असे नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने नियमांचे पालन न केल्याबद्दल ‘गुगल’ ला दंड केला होता. याचा अर्थ असा की, भारतात काम करणा-या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना भारतीय कायदे व नियमांचे पालन करावेच लागेल. भारतीय संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचा सन्मान करावा लागेल. गुगल, फेसबुक, एक्ससारख्या कंपन्या अमेरिकी कायद्यानुसार काम करतात पण त्यांना भारतात काम करायचे असेल तर त्यांना भारतीय आयटी कायद्यांच्या कक्षेतच काम करावे लागेल. सध्या गुगलच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) ‘जेमिनी’ची चर्चा आहे.

‘जेमिनी’वर पंतप्रधान मोदी यांच्याविषयी खोटी आणि चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप आहे. गुगल अमेरिकेच्या अध्यक्षांबाबत चुकीची माहिती देऊ शकत नाही, मग ते भारतीय पंतप्रधानांबाबत चुकीची माहिती देण्यास कसे काय धजावतात? या संदर्भात केंद्रीय तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुगलला चांगलेच सुनावले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी चुकीची माहिती देत गुगलने आयटी कायद्यातील नियमांचे आणि क्रिमिनल तरतुदींचे उल्लंघन केले आहे. देशाच्या प्रमुखाबाबत प्रसारित केली जाणारी चुकीची माहिती ही आयटी नियम मोडणारी आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ‘जेमिनी’ लाँच करताना गुगलमध्ये एआयच्या नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचे म्हटले होते. ते खरे असले तरी या कंपन्यांनी आपण जेथे काम करतो तेथील नियमांचे पालन करायलाच हवे. मंगळवारी रात्री काही तासांसाठी मेटाचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद पडल्याने मेटाचे अब्जावधीचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. अमेरिकेतील शेअर मार्केट बंद होताना मेटाच्या शेअरची किंमत १.६ टक्क्यांनी खालीच होती. त्यामुळे मार्क झुकेरबर्गचे सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. भारतीय रुपयांमधील हा आकडा ८ अब्ज रुपयांहून अधिक आहे. ‘एक्स’चे सर्वेसर्वा एलन मस्कने सुद्धा ‘मेटा’ला ट्रोल केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR