41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रशहाजी बापू पाटलांना घरातच धक्का

शहाजी बापू पाटलांना घरातच धक्का

सोलापुरात भाजपलाही खिंडार

सोलापूर : सोलापुरात ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील बिराजदार यांच्या भावाने शेकडो समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रशांत पाटील बिराजदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

‘‘भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसवले आहे. त्यामुळे आता आम्ही भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मागील १० वर्षांपासून आम्ही भाजपासाठी काम करतोय. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार’’, अशी भूमिका प्रशांत पाटील यांनी प्रवेश करताना मांडली. ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांच्या उपस्थितीत काल त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

‘‘भाजपाच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आज प्रशांत बिराजदार पाटील हे ठाकरे गटात आले आहेत. त्यांच्या प्रवेशाने सिद्ध होत आहे की सोलापूर जिल्ह्यासह राज्यातून भाजप तडीपार होणार आहे. माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील हे देखील लवकरच पक्षात येतील. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होईल’’, असा मोठा दावा शरद कोळी यांनी केला.

शहाजी बापू पाटलांना घरातच धक्का
विशेष म्हणजे सोलापुरातच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांना देखील घरातच धक्का बसला आहे. आमदार शहाजी बापू पाटलांचे सख्खे पुतणे संग्रामसिंह पाटील राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश करणार आहेत. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहेत. संग्रामसिंह पाटील उद्या शरद पवारांना भेटून पक्ष प्रवेश करणार आहेत. ‘‘पवार साहेबांची विचारसरणी पटते म्हणून उद्या पक्ष प्रवेश करणार’’, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सोलापुरातील या घडामोडी आता कुठपर्यंत जातील? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका देखील होऊ घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले किंवा नाही झाले तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी वेगाने घडणार आहेत. या घडामोडींमध्ये भाजपची ताकद जास्त वाढणार किंवा नाही वाढणार? हे आता आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे. पण सध्या भाजपसाठी ‘करो या मरो’ची निवडणूक असणार आहे. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ताकद देखील मोठी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR